नाशिक – शासनाच्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप’ (स्मार्ट) योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांच्या घरांवर अत्यल्प खर्चात एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवून दिला जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या दुहेरी अनुदानामुळे पात्र ग्राहकांना नाममात्र हिस्सा भरून २५ वर्षे मोफत वीज मिळवणे शक्य होईल.
या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेऊन आपले वीज बिल शून्य करावे, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले. दिंडोरी उपविभागातील लखमापूर, दिंडोरी, वणी तसेच इतर विविध ठिकाणी पात्र ग्राहकांसाठी विशेष मेळावे व नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये ग्राहकांना योजनेची सविस्तर माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रसंगी नाशिक परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे व दिंडोरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
आर्थिक समीकरण कसे ?
केंद्र व राज्य शासनाच्या या ‘स्मार्ट’ योजनेचा मुख्य हेतू दारिद्र्यरेषेखालील आणि महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या राज्यातील पाच लाख घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे. ही संपूर्ण योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत छतावर एक किलोवॅटचा सौर प्रकल्प बसवण्यासाठी ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या ‘स्मार्ट’ योजनेत केंद्र सरकारच्या अनुदानासोबतच राज्य सरकारकडूनही अतिरिक्त अनुदान दिले जात असल्याने ग्राहकांना अतिशय कमी खर्चात हा प्रकल्प उभारता येईल. दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना केवळ दोन हजार ५०० रुपये हिस्सा भरावा लागणार आहे. तसेच १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनुसूचित जाती व जमातीच्या ग्राहकांना पाच हजार रुपये, तर सर्वसाधारण ग्राहकांना १० हजार रुपये हिस्सा भरावा लागेल. उर्वरित रक्कम अनुदानाच्या रूपात मिळणार आहे.
दरमहा १२० युनिट वीज निर्मिती
तांत्रिकदृष्ट्या, एक किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांची विजेची गरज या प्रकल्पातून सहज भागणार आहे. या प्रकल्पाची कार्यक्षमता सुमारे २५ वर्षे राहत असल्याने ग्राहकांना पुढील २५ वर्षांसाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे. अत्यल्प खर्चात २५ वर्षे मोफत वीज मिळवून देणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा अथवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
