​नाशिक : महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) वीज मीटर आणले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक देयकच मिळणार नाही, तर चक्क वीज दरात सवलत मिळवण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. नाशिक परिमंडलात आतापर्यंत विविध वर्गवारीच्या एकूण साडेपाच लाख ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी वीज मीटर बसविण्यात आले आहेत.

​नाशिक परिमंडलात आजवर ५ लाख ५७ हजार ४३८ ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक मंडलात २ लाख ५५ हजार ५७४, मालेगाव मंडलात ७८ हजार ७६२ तर अहिल्यानगर मंडलात २ लाख २३ हजार १०२ मीटर; घरगुती, शासकीय, नादुरुस्त व नवीन वीज जोडणी या वर्गवारीतील ग्राहकांकडे बसविले आहेत. ​

महावितरणने यापूर्वीही काळानुसार वीज मीटरमध्ये बदल केले आहेत. यांत्रिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक मीटरनंतर आता स्मार्ट डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जुने, सदोष किंवा नादुरुस्त मीटर बदलणे ही नियमित व कायदेशीर प्रक्रिया असून त्यासाठी ग्राहकांची लेखी परवानगी आवश्यक नाही. स्मार्ट टीओडी मीटर पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. यासाठी कोणतेही कर्ज काढलेले नसून केंद्र सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबवला जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटर रीडिंग थेट महावितरणच्या सर्व्हरवर पोहोचणार आहे. यामुळे चुकीचे रीडिंग, अंदाजे देयक किंवा घर बंद असल्याने देयक न मिळणे यांसारख्या तक्रारींना पूर्णविराम मिळेल. विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ८० पैसे ते एक रुपयापर्यंत सवलत मिळणार आहे. हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

अचूकता व बचत साध्य…

​स्मार्ट मीटरबाबत असलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ते ‘प्रीपेड’ आहेत. मात्र, हे मीटर ‘पोस्टपेड’च असून सध्याप्रमाणेच वीज वापरल्यानंतर महिनाअखेरीस देयक भरावे लागणार आहे. काही स्तरांवर स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढतील, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात स्मार्ट टीओडी तंत्रज्ञानामुळे घरगुती ग्राहकांचे वीजदेयक कमी होण्यास मदत होणार आहे. पारदर्शकता वाढल्यामुळे ग्राहकांना केवळ वापरलेल्या विजेचेच पैसे भरावे लागतील. स्मार्ट मीटर म्हणजे अचूकता आणि बचतीचा संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांनी हे मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे आणि महावितरणच्या आधुनिक सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाने केले आहे.