नाशिक – सध्या पावसाळा सुरु असून पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. एरवी, सहसा दृष्टीस न पडणारे साप पावसाळ्यात दिसू लागतात. आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच वसतिगृह मोठ्या संख्येने दुर्गम आणि डोंगराळ भागात आहेत. अशा ठिकाणी सापांचे वास्तव्य अधिक असते. सापांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आदिवासी विकास विभाग सतर्क झाला असून त्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या अनेक आश्रमशाळा व निवासी शैक्षणिक संस्था डोंगराळ व वनक्षेत्रालगतच्या भागात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा साप, विंचू तसेच इतर वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता लक्षात घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे. सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद आणि वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

शासनाने 18 ऑगस्ट 2026 रोजी सर्पदंशाचा समावेश अधिसूचित आजारामध्ये केला आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांची वेळेवर नोंद व अहवाल सादरीकरण, घटनांचे निरीक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच सर्पदंशावरील औषधांची उपलब्धता आणि साठवणूक केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षम करण्यासाठी १९ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त संतोष ठुबे यांनी सांगितले. या अभियानांतर्गत प्रत्येक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य शाळा व वसतिगृह स्तरावर स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ तसेच आरोग्य व वन विभागाच्या सहकार्याने किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

सर्पदंश झाल्यास काय करावे ?

या सत्रांमध्ये साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे, शांतपणे त्या ठिकाणापासून दूर जाणे, सर्पाला पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न न करणे, सर्पदंशाबाबतच्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणे, सर्पदंश झालेल्या व्यक्तीची हालचाल कमीत कमी ठेवणे आणि तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जनजागृती सत्रादरम्यान शाळेच्या परिसरात कोणताही जिवंत साप आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात येऊ नये, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, वसतिगृहांचे अधीक्षक व परिचारिका यांनी आपत्कालीन संपर्कांची माहिती दर तीन महिन्यांनी अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यामध्ये जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक, सर्पदंशावरील औषद उपलब्ध असलेल्या अथवा साठवणूक केलेल्या आरोग्य संस्थेची माहिती, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था व संपर्क क्रमांक तसेच स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल,” असे आदिवासी विकास विभागाचे प्रभारी आयुक्त गोपीचंद कदम यांनी सांगितले.