निर्बंध असताना राजकीय कार्यक्रमाबद्दल आश्चर्य

नाशिक : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून शहरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. सेना कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक सुरक्षित अंतर न ठेवता सहभागी झाले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास प्रतिबंध आहे. राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांवरही निर्बंध आहेत. असे असताना सत्ताधारी राजकीय पक्षाला मात्र या नियमातून सवलत मिळाली की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

करोना काळात शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा झाला. यानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दृकश्राव्य माध्यमातून राज्यातील खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, तालुकाप्रमुख आदींशी एकाच वेळी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी शालिमार येथील सेना कार्यालयात खास व्यवस्था करण्यात आली होती.

वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतांना महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेनंतर कोणकोणती काम केली, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सद्यस्थितीत शिवसैनिकांनी स्वत:ची काळजी घेऊन लोकांची मदत करायला हवी, असे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या विस्ताराचा आलेख मांडला. संजय राऊत यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. खडतर वाटचालीतून शिवसेना पक्ष आज या उंचीवर पोहोचल्याचे त्यांनी मांडले.

खुद्द पक्षप्रमुख संवाद साधणार असल्याने खासदार हेमंत गोडसे यांच्यासह जिल्ह्य़ातील सेनेचे आमदार, माजी आमदार, पदाधिकारी  आवर्जुन उपस्थित होते.

३५ ते ४० जण मुखपट्टी लावून कार्यक्रमात सहभागी झाले. परंतु, त्यांना परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याचा विसर पडला. एक ते दीड तास पदाधिकारी या सभागृहात एकमेकांच्या जवळ बसले होते. मुळात गर्दी टाळण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांवर प्रतिबंध

आहे. बाजारपेठेत नागरिक, व्यापाऱ्यांसाठी प्रशासनाने भलीमोठी नियमावली जाहीर केली आहे. दुसरीकडे सेनेच्या कार्यक्रमात एकाच ठिकाणी अशी गर्दी होऊनही यंत्रणेने दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.