नाशिक – जिल्ह्यातील येवला-नांदगाव मार्गावरील सोमठाणे घाटात मंगळवारी सकाळी मध्य प्रदेशातील खासगी आराम बस उलटली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तसेच २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
येवला नांदगाव मार्गाने मध्य प्रदेशातील खासगी बस जात होती. बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते. बस पहाटे सोमठाणे जोश घाटातून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. आणि बस थेट रस्त्यावरच उलटली.बसमधील अनेक जण झोपेतच होते.
अपघातामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. प्रत्येक जण मिळेल त्या खिडकीतून बाहेर पडण्याची धडपड करु लागला. गाडी उलटल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त बसकडे धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तसेच २५ हून अधिक जखमी झाले. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अन्य जखमींना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. बस रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्याने येवला-नांदगाव मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
