नाशिक : सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने अनेकांना झळ सोसवत नाही. शरीराला थंडावा मिळावा, यासाठी अनेकांकडून वॉटर पार्कचा पर्याय निवडला जात असला तरी सह्याद्रीच्या रांगेतील बाराही महिने कोसळणारे धबधबेही पर्यटकांना खुणावत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगर कुशीतील धबधबे, रान भ्रमंती, मोकळी हवा नागरिकांना साद घालत आहे. मात्र ही ठिकाणी शोधतांना माहीतगार सोबत असल्याशिवाय या पाऊलवाटांवर चालणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणारे ठरेल, असा इशारा येथील स्थानिकांनी
दिला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुका हा नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे. शहरापासून १० किलोमीटरवर अंबोली आणि अंबई गाव आहे. या गावांपासून हाकेच्या अंतरावर तोरंगण घाट लागतो. घाट लागण्याच्या सुरवातीला अंबई लागते. सुमारे दीड हजार लोकवस्ती असलेल्या या गावापासून एक किलोमीटरवर सदाहरीत वने आणि आजूबाजूला लक्ष वेधून घेणारे गडकोट आहेत. यामुळे पर्यटकांचे पाय या ठिकाणी वळतात. ही भ्रमंती सुरू असतांना खोल दरीमधून येणाऱ्या आवाजाने कान टवकारले जातात. आवाजाच्या दिशेने गेले असता बाराही महिने पर्यटकांना भुरळ घालणारे धबधबे दिसतात. अंबईपासून पाच किलोमीटरवर दुर्लक्षित असणारा खरशा हा धबधबा बाराही महिने कोसळत असतो. हा धबधबा बघणे आणि येथील थंडगार पाण्याचा मनमुराद आनंद घेणे, हे साहसी पर्यटकांचे काम आहे.
येथूनच जवळपास असणारा दुगारवाडीचा धबधबा हा पावसाळय़ात आकर्षित करतो. पण खरशा, मांजरकुंट धबधबे अगदी मे महिन्याच्या शेवटच्या हंगामातही कोसळत असतात. आजूबाजूची वनसृष्टी ही हिरवीगार नसले तरी या ठिकाणी पाणी असते. या ठिकाणी कुंड आहेत. त्या ठिकाणी सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेवाळ झाले आहे. खरशा धबधबा हा अति उंचावरून कोसळत असला तरी तो दुर्लक्षित राहिला आहे. येथील वाहते पाणी स्वच्छ आणि शुभ्र असून मनमोहक वातावरण आहे. गावापासून धबधब्यापर्यंत येण्यासाठीचार ते पाच किलोमीटर पायी चालण्याची तयारी हवी. रस्ता अर्थातच चढाई-उतराईचा आहे. एखादा स्थानिक माहितगार सोबत असेल तर भ्रमंतीची मजा चांगलीच घेता येईल.
काय बघाल ?
सह्याद्रीचे गडकोट, चढ आणि उतार, नागमोडी वळणे, चिरेबंदी खडकाळ भाग, जंगलाची सफर, अंजनेरी, ब्रम्हगिरी, हरिहर, भास्कर गड, उतरवड, फणा हे दुरून दिसणारे गड किल्ले. रान फळांचा आस्वाद. तोरण फळ, करवंदे, आंबा, रान भाज्या, इ.