जळगाव : रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी दक्षिण-मध्य रेल्वेने मोठी संधी उपलब्ध करून दिली असून, प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांसाठी तब्बल २८०१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची निवड थेट गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार असल्याने राज्यातील तसेच देशभरातील तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये या भरतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार विविध तांत्रिक ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या कार्यपद्धतीमध्ये तांत्रिक कौशल्याला मोठे महत्त्व असल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या माध्यमातून रेल्वेच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाच्या काळात उमेदवारांना संबंधित कामकाजाची सविस्तर माहिती, उपकरणांचा वापर, तांत्रिक प्रक्रिया आणि कामातील शिस्त याबाबत अनुभव मिळणार आहे. या भरतीसाठी पात्रता निकषही स्पष्ट करण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. या दोन्ही शैक्षणिक पात्रतेच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक
दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीचा विचार करून अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. यात दहावीची गुणपत्रिका, जन्म दाखला, आयटीआयच्या सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक, संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), दिव्यांग प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. अर्ज करताना कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये याची उमेदवारांनी विशेष काळजी घ्यावी. अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो, असे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.
अर्ज कुठे करता येईल?
या भरतीसाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ११ एप्रिल २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आल्यावर संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी शक्यतो लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अर्ज शुल्क ऑनलाइन भरता येणार
या भरती प्रक्रियेसाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, अनुसूचित जातीसह अनुसूचित जमाती, महिला आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
भारतीय रेल्वे हा देशातील सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मानला जातो. लाखो कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या या उपक्रमात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणे हे तरुणांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरु शकते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना पुढील रोजगाराच्या संधीही उपलब्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण पात्र तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या भरतीमुळे हजारो तरुणांना रेल्वे क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.
