जळगाव: जिल्ह्यातील भुसावळसह जळगाव, धरणगाव, अमळनेर परिसरातून राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने, रेल्वे प्रशासनाने काकीनाडा–हिसार–काकीनाडा दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे गाडी भाविकांसह सामान्य प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ०७७०५ ही विशेष गाडी १८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत धावणार आहे. तर ०७७०६ ही विशेष गाडी २२ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत धावणार आहे. या कालावधीत ही विशेष रेल्वे ठराविक दिवसांमध्ये सेवा देणार असल्याने भाविकांना आपले दर्शन नियोजन करणे सोपे होणार आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळसह जळगाव, धरणगाव आणि अमळनेर स्थानकावर या विशेष रेल्वे गाडीला थांबा देण्यात आला आहे. खाटूश्यामजीकडे जाण्यासाठी ही गाडी दर गुरुवारी सकाळी ०८.४५ वाजता धरणगाव स्थानकावरून रवाना होणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात भुसावळ व अकोला दिशेने जाणारी ही गाडी दर मंगळवारी सकाळी ०४.१८ वाजता धरणगाव स्थानकावर थांबणार आहे. यामुळे धरणगावसह अमळनेर व आसपासच्या भागातील भाविकांना थेट व सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.

आतापर्यंत खाटूश्यामजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना बस किंवा अनेक गाड्या बदलाव्या लागत होत्या. मात्र, या विशेष रेल्वेमुळे प्रवासाची वेळ, खर्च आणि त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. धरणगाव व अमळनेरला मिळालेल्या या अतिरिक्त रेल्वे सेवेबद्दल जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी समाधान व्यक्त केले आहे. या सेवेकरिता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे त्यांनी विशेष आभार मानले असून, खान्देशातील भाविकांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

एकूणच खाटूश्यामजी दर्शनासाठी सुरू झालेली ही विशेष रेल्वे सेवा जळगाव, धरणगाव–अमळनेर परिसरातील भाविकांसाठी वरदान ठरणार असून, आगामी काळात अशाच आणखी सुविधांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

काकीनाडा–हिसार विशेष गाडीचे थांबे

समलकोट जंक्शन, राजमुंद्री, तनुकू, भीमावरम टाउन, अकिविडू, कैकालूर, गुडीवाडा जंक्शन, विजयवाडा जंक्शन, गुंटूर जंक्शन, सत्तेनापल्ले, मिऱ्याला गुडा जंक्शन, नलगोंडा , चारलापल्ली, मेदचल, कामारेड्डी, निजामाबाद जंक्शन, बसर, धर्माबाद, मुदखेड जंक्शन, हजूर साहिब नांदेड, पूर्णा जंक्शन, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला जंक्शन, शेगाव , मलकापूर, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, उधना जंक्शन, वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन, मंदसोर, निमच, चितोडगड जंक्शन, भिलवाडा, विजयनगर, नसीराबाद (जिंशाननगर), अजमेर, किशनगड, नवलगड, झुनझुनुन, चिरावा, लोहारू जंक्शन आणि सादुलपूर जंक्शन.