जळगाव : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त हुजूर साहेब नांदेड येथे शनिवारी आणि रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने जळगाव–भुसावळमार्गे चंडीगड आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून दोन दिवस विशेष सुपरफास्ट रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त हुजूर साहेब नांदेड येथे देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात आहे. त्याअनुषंगाने चंडीगडसह दिल्ली आणि मुंबईहून दोन दिवस विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष रेल्वे व्यवस्थेमुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून नांदेडला येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी सर्व आवश्यक नियमांचे पालन करावे. तसेच सुरक्षित व सुयोग्य प्रवासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ०४५२३ हुजूर साहेब नांदेड ते चंडीगड (चार फेरी) ही विशेष गाडी २५ आणि २६ जानेवारी रोजी हुजूर साहेब नांदेड येथून ०९.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी चंडीगड येथे ०८.०० वाजता पोहचेल. ०४५२४ ही विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी चंडीगड येथून ०५.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हुजूर साहेब नांदेड येथे ०१.३० वाजता पोहचेल. पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, आग्रा कॅट, पलवल, दिल्ली सफदरजंग, पानीपत आणि अंबाला कॅट येथे थांबा असेल.

०४४९३ हुजूर साहेब नांदेड ते हजरत निजामुद्दीन (चार फेरी) ही विशेष गाडी २४ आणि २५ जानेवारी रोजी हुजूर साहेब नांदेड येथून ०८.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन येथे ११.२० वाजता पोहचेल. ०४४९४ ही विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी हजरत निजामुद्दीन येथून १२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हुजूर साहेब नांदेड येथे ०४.२० वाजता पोहचेल. पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, आग्रा कॅट आणि पलवल येथे थांबा असेल.

मुंबईतुनही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ०१०४१/०१०४२ लोकमान्य टिळक टर्मिनस–नांदेड ही विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी ०३:३० वाजता मुंबईहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता नांदेडला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी येथे थांबणार आहे. परतीच्या प्रवासात हीच गाडी २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजता नांदेडहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ०१:४० वाजता मुंबईत दाखल होईल. या गाडीत १८ डबे असून, स्लीपरसह जनरल व एसी कोचची सुविधा उपलब्ध असेल.