नाशिक – राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर गुरूवारी सकाळपासून बस स्थानके पुन्हा गर्दीने गजबजली. पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. दोन दिवसाच्या आंदोलनामुळे महामंडळाचा नाशिक विभागातून दोन कोटीहून अधिक रकमेचा महसूल बुडाला.

हेही वाचा >>> आधी मोटारसायकलींची चोरी, नंतर दोघांंमध्ये वाटणी चोरांचा अनोखा समन्वय

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. बुधवारी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीतर याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनामुळे दोन दिवस नोकरदार, विद्यार्थी, प्रवाशी यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्याने प्रवाशांना एक ते दोन तास बस स्थानक परिसरात थांबावे लागले. विशेषत: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी कसरत करावी लागली. नाईलाजाने आर्थिक तोषिस सहन करत खासगी प्रवासी वाहनाने इच्छित स्थळ गाठावे लागले. नाशिक विभागात कर्मचाऱ्यांनी अधिक प्रमाणात आंदोलनात सहभाग घेतल्याने इगतपुरी, कळवण, सटाणा, लासलगाव आगार वगळता अन्य ठिकाणी बससेवा विस्कळीत झाली होती.

हेही वाचा >>> नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

बुधवारी उशीरा आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर गुरूवारी सकाळपासून बससेवा पूर्ववत सुरू झाली. यामुळे सकाळपासूनच स्थानकात प्रवाशांची गर्दी जाणवण्यास सुरूवात झाली. याविषयी विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी माहिती दिली. दोन दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती बहुसंख्य प्रवाशांना नसल्याने गुरुवारी बससेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्ण क्षमतेने सर्वच आगारातून गुरुवारी बससेवा सुरू झाली. दोन दिवस आंदोलनामुळे बससेवा ठप्प झाल्याने दोन कोटीचा महसूल बुडाल्याचे सिया यांनी नमूद केले.