नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी २२ एप्रिल ही अंतिम मुदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली असताना त्याआधीच कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तीन हजार ७३८ कर्मचारी कामावर रुजू असून उर्वरित ९५२ कर्मचारी ३० एप्रिलपर्यंत रुजू होतील, असा दावा महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

 राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी सहा महिन्यांहून अधिक काळापासून संप सुरू ठेवला आहे. या संपात राज्यातील वेगवेगळय़ा आगारातील वाहनचालक, वाहक यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. नाशिक विभागही यास अपवाद राहिला नाही. नाशिक विभागातील चार हजार ७९० कर्मचारी संपात सहभागी झाले. त्याचा प्रवासी सेवेवर विपरीत परिणाम झाला. राज्य परिवहनच्या नाशिक विभागातर्फे लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला, शटल सेवा, विनावाहक सेवा, ग्रामीण भागात बससेवा देण्यात येते. संपात कर्मचारी सहभागी झाल्याने कामात अडचणी येत राहिल्या.  बससेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर चालक रुजू करत काम सुरू राहिले. परंतु अपेक्षेप्रमाणे चालक उपलब्ध न झाल्याने अत्यंत मर्यादित स्वरूपात बस सेवा सुरू राहिली. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार यांना वेगवेगळय़ा अडचणींना तोंड द्यावे लागले. संपकऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर संपातील सहभागी कर्मचारी कामावर येण्यास सुरुवात झाली.

नाशिक विभागात चार हजार ७९० कर्मचाऱ्यांपैकी ९५२ कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत. ३० एप्रिलपर्यंत हे कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, करोना संसर्ग तसेच संप यामुळे बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती सद्यस्थितीत शिवशाही, निमआराम, साध्या अशा ७१० बस नाशिक विभागात कार्यरत आहेत. आवर्तन पध्दतीने यातील ३०० बस सध्या सेवेत आहेत. तसेच ७० टक्के मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र पूर्ण क्षमतेने हे कर्मचारी सेवा देऊ शकणार नाहीत. सहा महिन्यांचा कालावधी त्यांच्या रजेसाठी झाल्याने त्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना कामावर रुजू करण्यात येईल, असे पाटील यांनी नमूद केले. त्या अनुषंगाने नियोजन सुरू आहे. एप्रिल अखेपर्यंत बससेवा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.