प्रवाशांची गैरसोय सुरूच

नाशिक : एस. टी कर्मचारी मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले असून मंगळवारी पंचवटी आगारातील कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी मुंडन आंदोलन केले. जिल्ह्यातील १३ आगारातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने प्रवासी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. प्रवाश्यांचे हाल सुरू असतांना कर्मचारी संघटना संप सुरु ठेवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील बस सेवा बंद आहे.

एन.डी. पटेल रस्त्यावरील महामंडळाच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळय़ा संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी धरणे आंदोलनाला सुरूवात केली. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आपच्या वतीने पािठबा दर्शविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मागण्या मान्य न झाल्यास संघटना अधिक आक्रमक होतील, असा इशारा देण्यात आला.

प्रवाशांचे हाल

मंगळवारी दुपारनंतर सर्वच बस स्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला. बससेवा सुरू नसल्याने अनेकांनी खाजगी वाहनांचा आधार घेत प्रवास पूर्ण करण्याकडे कल ठेवला. जिल्ह्यात वेगवेगळय़ा ठिकाणी फाटय़ावर, स्थानकांबाहेर लोक उभे राहिल्याचे चित्र दिसले. नियमीत भाडय़ापेक्षा खासगी वाहनधारकांना अधिकचे पैसे देत मार्गस्थ होत आहेत. शाळा बंद आहेत. मात्र शाळेत होणाऱ्या राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण कामासाठी शाळेत ये-जा करावी लागते. बस संप असल्याने शाळेत पोहचण्यासाठी अडचणी येत असून दुचाकी चालवता येत नसल्याने मित्राच्या दुचाकीवरून शाळेत जात असल्याचे रत्नाकर क्षीरसागर यांनी सांगितले. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपण वेगवेगळय़ा मालवाहतूक वाहनांचा आधार घेत कामाचे ठिकाण गाठत असल्याची माहिती दिली. दिवाळीच्या सुट्टीत बाहेर फिरण्याचे नियोजन केलेल्या बासंती शहा यांनी भाऊबीजेनिमित्त अहमदाबाद येथे जाण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र संप सुरू झाल्याने बेत रद्द करावा लागल्याचे त्या म्हणाल्या.  धुळे येथील भिकाजी पाटील यांची खंत वेगळीच आहे. दिवाळीनिमित्त ते लेकीला घेण्यासाठी नाशिकला आले. मात्र संप सुरु झाल्यामुळे ते दोन दिवसांपासून नाशिकमध्ये अडकले आहेत. तीन दिवसांपासून बसस्थानकावर येत असून धुळे गाठण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण खाजगी वाहनचालकांचे दर ऐकूनच घाम फुटत असल्याचे पाटील यांनी सांगितले. जळगाव येथील शबाना शेख यांनी नाशिकला येण्यासाठी संप असल्यामुळे खाजगी वाहनाचा आधार घेतला. मात्र थेट नाशिकपर्यंत ही व्यवस्था नसल्याने जळगावहून धुळे, धुळय़ाहून मालेगाव आणि मालेगावहून नाशिक गाठले. यात खूप पैसे आणि वेळही गेला. मालेगाव येथील सचिन देशमुख यांनी सोबतच्या अन्य सहकाऱ्यांच्या खाजगी वाहनाचा आधार घेत नाशिक गाठले.