scorecardresearch

विसर्जन मिरवणुकीत शिस्तीसाठी कठोर नियम ; सकाळी ११ वाजता प्रारंभ; ध्वनिवर्धकावर बंदी कायम, मंडळांना पारंपरिक वाद्यांचा आधार, रेंगाळणाऱ्या मंडळांवर कारवाई

शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीवर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाचा प्रभाव असतो.

विसर्जन मिरवणुकीत शिस्तीसाठी कठोर नियम ; सकाळी ११ वाजता प्रारंभ; ध्वनिवर्धकावर बंदी कायम, मंडळांना पारंपरिक वाद्यांचा आधार, रेंगाळणाऱ्या मंडळांवर कारवाई
(विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांकडून संचलन करण्यात आले. ) (छाया-यतीश भानू)

नाशिक : शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीवर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाचा प्रभाव असतो. संबंधित पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते नारळ फोडून या मिरवणुकीला सुरुवात होते. म्हणजे तो नेता जेव्हा येईल, तेव्हा विसर्जन मिरवणूक सुरू होते. करोनाच्या आधी म्हणजे २०१९ मध्ये याच कारणाने मिरवणूक निर्धारित वेळेच्या तीन ते चार तास उशिराने सुरू झाली होती. महापालिकेत सध्या कुणाचीही सत्ता नाही. प्रशासकीय राजवटीत या मिरवणुकीवर कुणाला थेट दबाव टाकता येणार नाही. किंबहुना तो दूर करण्याचा गणेशोत्सव महामंडळाने संकल्प करीत यंदाची विसर्जन मिरवणूक कुणाही राजकीय नेत्यांची प्रतीक्षा न करता, आहे त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता सुरू करण्याचे निश्चित केले आहे. ध्वनिवर्धकास बंदी असल्याने सार्वजनिक मंडळांना पारंपरिक वाद्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये अंतर पडणार नाही, याची काळजी पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागेल. अन्यथा रेंगाळणाऱ्या मंडळाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी मंगळवारी भद्रकाली पोलीस ठाण्यात उपायुक्त अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटय़े, माजी नगरसेवक गजानन शेलार, विविध मंडळांचे पदाधिकारी, मनपाचे अधिकारी आदी उपस्थित होते. उशिराने निघणाऱ्या आणि अनेक ठिकाणी रेंगाळणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत अखेरच्या क्रमांकावर असणाऱ्या गणेश मंडळांना वाद्यांच्या गजरात मिरवणूक मार्गावरून विहित वेळेत जाता येत नाही. या कारणास्तव या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या कमी आहे. करोनाच्या आधी म्हणजे २०१९ मध्ये दुपारी एक वाजता निघणारी मिरवणूक तत्कालीन पालकमंत्री उशिराने आल्याने चार, साडेचार वाजता निघाली होती. तोपर्यंत सर्व मंडळे ताटकळत बसली होती. मनपातील सत्ताधाऱ्यांचा मिरवणुकीवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पडणारा दबाव मंडळांचे पदाधिकारी नेहमीच अनुभवतात. अनेक राजकीय नेत्यांची गणेश मंडळे आहेत. त्यांच्याकडून क्रमवारी पुढे मागे करणे, रोषणाईसाठी मिरवणूक रेंगाळण्याचे प्रकार घडतात. हे सर्व प्रकार मनपातील प्रशासकीय राजवटीत दूर करण्यासाठी गणेशोत्सव महामंडळाने तयारी केली आहे. मिरवणुकीत सहभागी सर्व मंडळांना वाद्यांसह मिरवणूक मार्गावरून विसर्जनस्थळी जाण्याची संधी मिळावी, यासाठी यंदाची मुख्य विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता काढण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक आमदार व राजकीय नेत्यांना ही वेळ कळवली जाईल. त्यावेळी जे उपस्थित असतील, त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार असल्याचे शेटय़े यांनी सांगितले. प्रमुख नेत्यांना विलंब झाल्यास ते मिरवणूक मार्गावर येऊन पहिले मंडळ जिथे असेल तिथे नारळ फोडू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

२०१९ मध्ये मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या २१ होती. तेव्हाची क्रमवारी यावेळी कायम ठेवली जाईल. यंदा मिरवणुकीत ३० मंडळे सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यात वाढदेखील होऊ शकते. काही मंडळे आकर्षक रोषणाई करतात. त्यांचा कल अंधार पडल्यानंतर मार्गस्थ होण्याचा असतो. अशा मंडळांना क्रमवारीत अखेरचे क्रमांक घेण्यास सांगण्यात आले आहे. ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास मनाई राहणार आहे.

मिरवणूक रेंगाळू नये यासाठी उपाय

रस्त्याच्या एकाच बाजूला स्वागत व्यासपीठ

ठिकठिकाणी आरती बंद

स्वागतोत्सुकांना खाली उतरून स्वागत करावे लागणार

मंडळांचे पदाधिकारी व्यासपीठावर जाणार नाही

दोन मंडळांमध्ये अंतर पडू नये ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Strict rules for discipline in immersion processions amy

ताज्या बातम्या