नाशिक : अंबड आणि सातपूर येथील शेतकऱ्यांनी औद्योगिक विकासासाठी दिलेल्या जमिनींवर कंपन्या सुरू झाल्या. परंतु, त्यापैकी बंद पडलेल्या कंपन्यांची जमीन महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाने शेतकऱ्यांना परत न करता बांधकाम व्यावसायिकाला विकण्यात येत असल्याच्या आरोपाची चौकशी करावी यासह नवउद्योजक आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती २९ मे रोजी नाशिक ते दिल्लीतील राष्ट्रपती भवन असा ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली.
अंबड, सातपूर येथील शेतकऱ्यांनी १९७३ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी सुमारे ११०० हेक्टर जमीन दिली. त्यावेळेस शेतकऱ्यांना काही आश्वासने देण्यात आली होती. कोणत्याही आश्वासनांची शासनाने पूर्तता केली नाही. अनेक भूखंडधारकांनी पोटभाडेकरू ठेवून घरबसल्या भाडे कमविण्याचा देखील व्यवसाय महामंडळातील जागेत केला जात असल्याचा आरोप दातीर यांनी निवेदनात केला आहे. ज्या पध्दतीने महामंडळाने विकास करायला पाहिजे होता, तसा तो झाला नाही. मोठे भूखंड हे न्यायायलयीन प्रक्रियेत अडकवून विकासकांना कसा लाभ होईल, या पध्दतीने कार्यपध्दती सुरु आहे की काय, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही. महामंडळाचे अधिकारी शेतकऱ्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत. नवउद्योजक अथवा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अधिकारी दाद देत नाहीत. महामंडाळाच्या कार्यक्षेत्रात कुठलीही सांडपाणी व्यवस्था करण्यात आलेली नाही. औद्योगिक विकासासाठी ज्या मूलभूत सुविधा पाहिजे, त्यादेखील महामंडळ उपलब्ध करून देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासुन महामंडळातील कार्यालयात अनेक निवेदने दिली. आंदोलने केली. वरिष्ठ पातळीवर देखील अनेक वेळा निवेदने सादर केली. तरीदेखील महामंडळाच्या कोणत्याच अधिकाऱ्याकडे अथवा वरिष्ठ पातळीवर न्याय मिळत नाही. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २९ मेपासून नाशिक ते दिल्ली ( राष्ट्रपती भवन ) पर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असून याची महामंडळाने नोंद घ्यावी, अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद कंपनी सुमितसह इतर बंद कंपन्यांच्या जागा विक्रीची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन येथील कार्यालयात देण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर, शांताराम फडोळ. गोकुळ दातीर. विक्रम दातीर आदी उपस्थित होते.