​नाशिक: ज्याप्रमाणे शेतकरी जमिनीचे माती आरोग्य पत्रक बनवतात, त्याप्रमाणे आश्रमशाळेत प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘चिरायु माझे आरोग्य’ पोर्टल हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांची आरोग्य कुंडली तयार केली जाईल. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

​नाशिक रोड येथील मित्रा सभागृहात आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. उईके यांच्या हस्ते ई-डिजिटल आरोग्य पत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, सहसचिव एम. आर. शेळके, अपर आयुक्त गोपीचंद कदम, आयुषी सिंह, दिनकर पावरा आदी उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजित वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. अधिकारी हे आदिवासी समाजासाठी विकासाचे वाहक असतात. कर्तव्य पार पाडताना त्यांनी नैतिक जबाबदारी ओळखून सकारात्मक विचार केल्यास गतिमान विकास होईल. आदिवासी समाजाचे दैवत, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी ‘पर्यटन’चा स्वतंत्र प्रमुख तयार करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी दिल्या.

​दरम्यान, डॉ. उईके यांनी बैठकीत जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) खर्च व नियोजन, आदिवासी विकास विभागाचे कार्यालयीन वेळापत्रक, राणी दुर्गावती महिला सबलीकरण योजना, केंद्रवर्ती अर्थसंकल्प (एनबी) योजना, पर्यटन आदींचा आढावा घेतला. यावेळी अपर आयुक्त कार्यालयामार्फत विविध योजनांच्या अंमलबजावणीचे सादरीकरण करण्यात आले. प्रास्ताविक आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी केले. यावेळी उपायुक्त, सर्व प्रकल्प अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​असे असणार आरोग्य पत्रक

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो. यामध्ये काहींना आनुवंशिक त्रास तर काहींना बदलत्या वातावरणाचा त्रास होत असतो. मात्र यावर वेळेत उपचार होतोच असे नाही. काही वेळा हे प्रकरण विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतते; अशा काही घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेवर नियुक्त नर्सद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्यविषयक सर्व माहिती डिजिटल आरोग्य पत्रकामध्ये संकलित केली जाईल. आश्रमशाळा, प्रकल्प अधिकारी व अपर आयुक्त कार्यालय तसेच आदिवासी विकास आयुक्तालय स्तरावरून आरोग्य पत्रकाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

​डिजिटल आरोग्य पत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यात हिमोग्लोबिनसह सिकलसेल, नेत्र तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे आजारांचे वेळेत निराकरण करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल उपयुक्त ठरेल.
लीना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)