scorecardresearch

निर्बंधानंतरचा शाळेचा पहिला दिवस गारठला

जिल्ह्यात १४ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी शाळेची बेल वाजली. बदलते वातावरण, थंडीचा तडाखा, गारठा, पालकांच्या मनातील संभ्रम, करोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नाममात्र राहिली.

थंडीमुळे विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती

नाशिक : जिल्ह्यात १४ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी शाळेची बेल वाजली. बदलते वातावरण, थंडीचा तडाखा, गारठा, पालकांच्या मनातील संभ्रम, करोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नाममात्र राहिली. महापालिका हद्दीतील काही शाळा सुरूच झाल्या नाहीत.  करोना रुग्णांचा आलेख उंचावत असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभाग तसेच प्रशासनाकडून करण्यात येत आहे. १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. ग्रामीणसह शहर परिसरातून शाळा सुरू करण्याची सातत्याने मागणी झाल्याने शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये घंटा वाजली. विद्यार्थ्यांचे तापमापन, तो तंदुरूस्त असल्याचे प्रमाणपत्र तसेच अन्य काही सुरक्षा उपायांचा अवलंब करीत शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु, एरवीचा उत्सााह शाळांमध्ये दिसला नाही. दोन ते तीन दिवसांपासून वातावरणातत मोठय़ा प्रमाणावर गारठा वाढल्याने बालकांसह अनेकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी सतावत आहे. यामुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले नाही.

निवासी विद्यालय सुरू करण्याबाबत आदेश नसल्यामुळे निवासी शाळा अद्याप बंद आहेत. काही शाळांमधील शिक्षक करोनाग्रस्त आहेत. मनमाड  शहर आणि परिसरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक  शाळा सुरु झाल्याने ओस पडलेले शाळांचे आवार मुलांच्या किलबिलाटाने गलबजून गेले.  शहरात नगरपालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील १६ प्राथमिक तर, इतर खासगी १८ अशा एकूण ३४ शाळा सुरू झाल्या. कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थी अत्यंत उत्साहाने आपापल्या वर्गात दाखल झाले. १४ दिवसानंतर सर्व शाळा, आवार पुन्हा एकदा फुलले. पूर्व माध्यमिक ते बालवाडी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले आहे.

यंदा गेल्या वेळेपेक्षा अधिक पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास सहमती दर्शविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहे. पालकही विद्यार्थ्यांना उत्साहाने शाळेत घेऊन आले होते. इतके दिवस बंद असलेल्या प्रत्यक्ष शिक्षणाचा पुन्हा एकदा श्रीगणेशा झाल्याने शैक्षणिक वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे. प्रत्येक शाळेमध्ये करोनाचे नियम पालन आणि सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पहिला दिवस उजळणीचा

नाशिक शहरात महापालिकेच्या १०१, खासगी ४४० अशा ५४१ शाळांमधून एक लाख ४८ हजार ८२३ विद्यार्थी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष उपस्थिती ३० हजार ९९३ इतकीच राहिली. १६ खासगी शाळा सुरूच झाल्या नाही. विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्याची जबाबदारी पालकांनी स्वीकारली.  तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती उत्तम राहिली. शाळेचा पहिला दिवस उजळणी करण्यातच गेला.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students first day school cold ysh