कोम्बॅक्ट आर्मी एव्हिशन स्कूल पाठोपाठ संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा परिसरात ड्रोनची घुसखोरी झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरातील सर्व ड्रोन मालक, चालकांना आपले ड्रोन तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधितांना ड्रोनद्वारे चित्रीकरण करावयाचे असल्यास आधी लेखी परवानगी घ्यावी लागेल. ही परवानगी दाखविल्यानंतर पोलीस ठाण्यातून ड्रोन मिळेल. चित्रीकरणही पोलिसांच्या देखरेखीत होईल. छायाचित्रण झाल्यानंतर ड्रोन पुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावे लागणार आहेत.

हेही वाचा >>> मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गौदागौरव’चे प्रकाशन

शहर पोलिसांनी पाच महिन्यांपूर्वी लष्करी आस्थापना, चलन छपाई करणारे मुद्रणालय, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी अशा विविध १६ संवेदनशील ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने मानवरहित विमानांच्या उड्डाणास प्रतिबंधित क्षेत्र अर्थात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ म्हणून जाहीर केली. या परिसराच्या दोन किलोमीटरच्या परिघात ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, गरम हवेचा फुगा, कमी वजनाची विमाने किंवा तत्सम हवाई साधनांचा पोलीस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय उड्डाण आणि वापर करण्यास मनाई आहे. परंतु, तशी कुठलीही परवानगी न घेता ड्रोन उडविले जात असल्याचे अलीकडेच संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा परिसरातील ड्रोनच्या घुसखोरीवरून समोर आले. महिनाभरापूर्वी गांधीनगर येथील लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्राच्या ( कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल अर्थात कॅट्स ) हवाई क्षेत्रात रात्रीच्या सुमारास ड्रोनने घुसखोरी केली होती. संशयित ड्रोन कॅट्सच्या हद्दीत शिरल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी सतर्क होऊन ते जमीनदोस्त करण्याची तयारी केली होती. मात्र, तत्पूर्वीच ते गायब झाल्यामुळे संशय बळावला. ड्रोनद्वारे कॅट्सची टेहळणी केली गेली काय, याबाबत साशंकता व्यक्त झाली. त्या प्रकरणाचा छडा लागला नसताना पुन्हा तसाच प्रकार ओझरजवळील दहाव्या मैलावरील डीआरडीओच्या प्रयोगशाळा परिसरात घडला होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास डीआरडीओच्या भिंतीलगत प्रतिबंधित क्षेत्रात कुणीतरी ड्रोन उडविले. संरक्षक भिंतीलगतचे ५०० मीटरचे क्षेत्र पूर्णत: प्रतिबंधित आहे. कुठलीही परवानगी न घेता हे ड्रोन उडविले गेले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयित ड्रोनचा शोध लागलेला नाही.

हेही वाचा >>> नाशिक : पंचवटी व सिडको भागात दोनशे खाटांच्या रुग्णालये प्रस्तावित करावे – पालकमंत्री दादा भुसे

शहरात किती ड्रोनधारक आहेत, याची आकडेवारी नाही. विना परवानगी उडविले जाणारे ड्रोन पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. या संदर्भात पोलीस आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर ड्रोनच्या विषयावर कठोर निर्णय घेण्यात आला. ड्रोनच्या विना परवानगी उड्डाणाच्या घटनांमुळे महत्वाच्या लष्करी आस्थापनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटना गंभीर असून त्यामुळे भविष्यात गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेकायदेशीर उड्डाणामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे घातपाती कृत्य, गुन्हे घडू नयेत याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी

आदेश कोणते ?

  • शहरातील ड्रोन चालक, मालक, व संचलन करणाऱ्यांनी आपले ड्रोन ते ज्या भागात वास्तव्यास आहेत अथवा व्यवसाय करतात, तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ जमा करावे.
  • ड्रोनद्वारे छायाचित्रणासाठी पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी बंधनकारक
  • लेखी परवानगी सादर केल्यानंतर पोलीस ठाण्याकडून ड्रोन मिळणार
  • कार्यक्रमाचे चित्रीकरण पोलीस कर्मचाऱ्याच्या देखरेखीत करावे लागणार
  • छायाचित्रण झाल्यानंतर ड्रोन पुन्हा पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक
  • लष्करी आस्थापनांना स्व मालकीच्या ड्रोनसाठी निर्बंध नाही, केवळ हवाई क्षेत्रात उड्डाणाबाबत पोलीस ठाण्यास माहिती द्यावी लागणार