scorecardresearch

गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आजचे यश, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी  केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे.

cm eknath shinde gopinath munde statue
नाशिक जिल्ह्यातील नांदूरिशगोटे येथे गोपीनाथ गड या स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ

नाशिक: गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी  केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे. शेतकरी, शेतमजूर, दलित, ओबीसी अशा सर्व घटकांना पक्षात आणून त्यांनी भाजपला जनतेचा पक्ष बनविले, राज्यात पक्षाच्या विस्तारात त्यांची अतिशय महत्वाची भूमिका राहिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

 शनिवारी गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील नांदूरिशगोटे येथे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच अनुषंगिक विकास कामांसह उभारलेल्या गोपीनाथ गड या स्मारकाचे लोकार्पण झाले.  वंचित, मागासलेल्या घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समर्पित भावनेने काम करणारे गोपीनाथ हे योध्दा होते. १९९२-९३ मध्ये संघर्ष यात्रा काढून त्यांनी महाराष्ट्र जागवला. त्यांच्या प्रयत्नातून १९९५ मध्ये शिवशाहीचे राज्य आले.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामात रिलायन्सची निविदा रद्द करतानाही ते आपल्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे तेव्हा १६०० कोटींची बचत झाली. आजच्या काळातील २० हजार कोटी रुपये वाचल्याचा दाखला गडकरी यांनी दिला. सिंचन प्रश्नांवर मुंडे यांनी नेहमीच आवाज उठवला.   आपण भाजपचा अध्यक्ष झाल्यानंतर केवळ दोन व्यक्तींनाच खाली वाकून नमस्कार केला. त्यात लालकृष्ण अडवाणी व गोपीनाथ मुंडे यांचा समावेश होता. मुंडे यांचा वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा आणि खासदार प्रीतम यांनाही सर्व क्षेत्रात प्रचंड यश नक्की मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

 एकनाथ शिंदे यांनी मुंडे यांचे संघटन कौशल्य, अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्वाचा संदर्भ देऊन त्यांनी अठरापगड जातींसाठी कामे करीत माणसे जोडल्याचे सांगितले. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासोबत त्यांच्या नावे रुग्णालयही उभारले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 00:02 IST