नाशिक: नऊ वर्षांपासून बंद पडलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम चाचणी सोमवारी यशस्वी झाली. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक या तालुक्यातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारखाना पुन्हा सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कारखान्याच्या गळीत हंगाम चाचणीसाठी शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली. तत्पूर्वी दीपक चांदे, सागर गोडसे, भाग्यश्री गोडसे यांच्या हस्ते गव्हाण आणि काटय़ाची पूजा करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, कारखान्याचे माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दीपक पाटील, सरपंच सुरेखा गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी आदी उपस्थित होते. यावेळी शांतीगिरी महाराजांनी खासदार गोडसे यांच्या संघटन कौशल्यामुळे नऊ वर्षांपासून बंद असलेला कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरू होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
कर्जबाजारीपणामुळे नऊ वर्षांपासून कारखाना बंद होता. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक या तालुक्यातील ऊस उत्पादकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. कारखान्याची सुत्रे दोन महिन्यापूर्वी खासदार गोडसे आणि दीपक बिल्डर्स डेव्हलर्पस यांच्याकडे आली. गोडसे यांनी आपले संघटन कौशल्य पणाला लावत कारखाना सुरू करण्याचा निर्धार करुन कारखान्यातील यंत्रांची दुरुस्ती केली. अवघ्या महिनाभरात कारखान्याचे अग्निप्रदिपन करण्यात आले. यंत्रांची दुरुस्ती झाल्यानंतर सोमवारी गळीत हंगामाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. यावेळी खासदार गोडसे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. शेतक-यांच्या हितासाठी आणि
त्यांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कारखाना चालविण्याचे शिवधनुष्य सर्वाच्या आशीर्वादाने उचलले आहे. त्यामुळे उस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वाची साथ फार महत्वाची आहे. कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी करून पुढील गळीत हंगामाची तयारी सुरू करणार आहोत. – हेमंत गोडसे, खासदार