शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा सल्ला

नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्यातील वाद एकत्र बसून सोडवावा. बालकांनी पालकांप्रमाणे, तर पालकांनी बालकांप्रमाणे वागू नये, असा सल्ला शिवसेनेचे मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. पाटील हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कांदे यांना गुन्हेगारी विश्वातून धमकी देण्यात आली असली तरी त्यांनी या धमकीला घाबरू नये. सध्या राज्यात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पाऊस सुरू आहे. पूरग्रस्तांना मदत होण्यासाठी केंद्राने सरकारला पैसे द्यायला हवेत. परंतु केंद्र काही मदत देत नाही.

ईडी हे ब्रह्मास्त्र असून त्याचा वापर कधीही कोठेही होऊ शकतो. परंतु त्याचा कुठेही वापर करून ते बोथट करू नये, असे पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात पावसामुळे ३५०० हेक्टर केळीचे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरे आणि शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येकाचा पीकपेरा वेगळा असल्याने सरसकट मदत देता येत नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकऱ्यांना मदत मिळेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना थेट आर्थिक मदत करावी आणि नंतर पंचनामे करावेत, अशी मागणी केली असल्याकडे पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले असता, मागणी करणे सोपे असले तरी निर्णय पंचनाम्यानंतर होईल. जिथे पूरस्थिती असेल त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्यात येईल. पुराचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.