नाशिक – टीसीएस प्रकरणात भाजपची मंडळी ट्विट करतात, पत्रकार परिषद घेऊन माहिती पुरवतात. त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करतात. या प्रकरणातून भाजपला केवळ हिंदू-मुस्लिम कथानक (नॅरेटिव्ह) उभे करायचे होते. त्याला पोलिसांनी पूर्णत: हातभार लावला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीतर्फे दोन दिवस कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी ग्रामीण भाग आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शहरात सभा आयोजित करण्यात आल्या. यावेळी सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत तीन मोठ्या प्रकरणांनी नाशिकला गालबोट लागल्याकडे लक्ष वेधले.
बहुचर्चित टीसीएस प्रकरणात भाजप व नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणात काही घटक वेगळे तथ्य शोधतात. त्याच्याशी पोलिसांच्या तथ्य शोधनाचा काहीही संबंध नसतो. भाजपच्या लोकांनी पुरवलेल्या माहिती जशी संहिता आहे, त्याला अनुसरून पोलीस कारवाई करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात ज्यांना अटक केली, ज्यांच्यावर संशय घेतला, त्यांचा सहभाग कसा होता, त्यांना बाहेरून कोणाचे पाठबळ मिळाले, याची कुठलीही माहिती, पुरावे पोलिसांनी दिले नाही, असे त्यांनी नमूद केले.
नीट पेपर फुटी हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. पेपर फुटीतून संबंधित युवकांचे करिअर धोक्यात येते. मुले अभ्यास करतात. यातून चांगली संधी मिळेल आणि नोकरी करता येईल अशी त्यांची अपेक्षा असते. पेपर फुटतो, तेव्हा त्यांचा २० ते २५ वर्षातील अभ्यास पाण्यात जातो. युवकांना पुढे चांगले आयुष्य जगण्यासाठी, शिक्षणातून संधी घेण्यासाठी दरवाजे बंद होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तपोवनमधील झाडे वाचविण्यासाठी नाशिकमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले. परंतु, कुंभमेळ्यासाठी लहान विक्रेते, फेरीवाले, गरीबांची घरे, झोपड्या हटविल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घेतल्या जात आहे. त्या विरोधात आवाज कधी उठवणार, असा प्रश्न त्यांनी केला. शहरात खोदलेल्या रस्त्यांची कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होतील का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
खरातशी संबंधित नेत्यांना ‘क्लिन चिट’ ची साशंकता
विविध गुन्ह्यांत भोंदूबाबा अशोक खरात कारागृहात आहे, परंतु, जे मंत्री, राजकीय नेते यांनी खरातला मोठे केले, पाठबळ दिले, संपत्ती पुरवली, त्याच्या आश्रमात थेट जलवाहिनी करून दिली, त्यांनाही शोधून कारवाई झाली पाहिजे. शिवनिका ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला झाला, तसेच खरातचे कारागृहात बरं-वाईट होईल, सर्व पुरावे मिटवून मंत्री व राजकीय नेत्यांना क्लिनचिट देण्याचा प्रकार केला जाईल, अशी साशंकता सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली.
