नाशिक – देशातील सर्वात मोठी वाईन उत्पादक कंपनी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक येथील सुला विनयार्डसने आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. सुला विनयार्डस आपल्या प्रगतीबरोबर नाशिक जिल्ह्याचीही प्रगती व्हावी, जिल्ह्याच्या प्रगतीत आपलाही वाटा असावा, या हेतूने कार्यरत आहे.

आपल्या या प्रगती पथावर सुला विनयार्डसने एक नवीन निर्णय घेतला आहे. हा निर्णय सुला विनयार्डसच्या प्रगतीत मोलाची भर घालणारा आहे. वाईनरीज क्षेत्रात सध्या सुला विनयार्डसने घेतलेल्या या निर्णयाची अधिक चर्चा आहे.

नाशिक शहराच्या पश्चिमेला गंगापूर धरणालगत ‘सुला विनयार्डस’ आहे. दररोज असंख्य पर्यटक वाईनची चव चाखण्यास तसेच चविष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.भारतात दरवर्षी सुमारे दीड कोटी लिटर वाइनचे उत्पादन होते. त्यात नाशिकच्या सुला विनयार्डसचा वाटा सर्वाधिक आहे. हजारो लोकांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रोजगार देणारी ‘सुला वाईन्स’ आज वाईनची जननी असलेल्या युरोपियन वाईनशी स्पर्धा करीत आहे.

सुला विनयार्डस आपल्या वाईनचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते. आपल्या ग्राहकांपपर्यंत आपले उत्पादन पोहचण्यासाठी सुला विनयार्डसकडून वेगवेगळ्यचा माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असतात. २००८ मध्ये वाइन आणि संगीत यांची मेळ घालून सुला विनयार्डसने सुलाफेस्ट सुरू केले. त्याला मिळालेल्या लोकप्रियतेत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे.

सुला विनयार्डसने आता नाशिकच्या दिंडोरी तालक्यातील जागतिक दर्जाची शेंदोन वाईनरी २० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार सुला विनयार्डसने मोएट हॅनेसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडबरोबर केला आहे. या व्यवहारामुळे नाशिक जिल्ह्यातील वाईन उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. नाशिकच्या वाईन टुरिझमला जागतिक स्तरावर अधिक चालना यामुळे मिळू शकेल.

शेंदोन वाईनरी परदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. कारण, नाशिकच्या ओझर विमनातळापासून अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत शेंदोन वाईनरी गाठता येते. त्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या वाढू शकते. शेंदोन वाईनरीचा ताबा आता सुला विनयार्डसकडे येणार आहे. मोएट हॅनेसी ही कंपनी जागतिक कीर्तीच्या लुई वितों समूहाचा भाग आहे. शेंदोन वाईनरी १९ एकरावर आहे. या वाईनरीची उत्पादन क्षमता वार्षिक चार लाख ५० हजार लिटर आहे. ही क्षमता १३ लाख लिटरपर्यंत वाढविण्याचा सुलाचा निर्धार आहे.

दिंडोरी हा भारतातील सर्वोत्तम वाईन द्राक्षांचा परिसर आहे. गंगापूर धरणाजवळ वाईन टुरिझम डेस्टिनेशनचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता, दिंडोरीमध्येही जागतिक दर्जाचे वाईन रिसाॅर्ट विकसित करण्याचा सुला विनयार्डसचा मानस आहे. सुला विनयार्डसमध्ये असलेल्या ‘द सोर्स’, ‘बियॉन्ड’ आणि ‘द हेवन’ या रिसॉर्टसची लोकप्रियता पर्यटक जाणून आहेत. आता दिंडोरीही यानिमित्ताने वाईन क्षेत्रात जागतिक नकाशावर येऊ शकणार आहे.