नाशिक: ऐन उन्हाळय़ात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांना टंचाईचा चटका सोसावा लागत असून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यात मनुष्याबरोबर पाळीव प्राणी, जंगली प्राणी, पक्ष्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी विहीर, नदी, नाल्यांचे स्रोतच आटल्याने ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. जल परिषद मित्र परिवाराने बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांमध्ये पाणी तर, सिमेंटचे बंधारे कोरडेठाक असे चित्र दिसत आहे.

त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी हे आदिवासी तालुके पावसाळा संपला की टंचाईमुळे ग्रस्त होतात. इतर कोणत्याही कामापेक्षा लोकांना उन्हाळय़ात पाणी कोठून आणावे, ही चिंता भेडसावत असते. काही ठिकाणी एखादा नाला किंवा झरा त्यांची तहान भागविण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमधील टंचाईची समस्या काहीअंशी का होईना, दूर करण्यासाठी या तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी गाव तेथे वनराई बंधारा मोहीम हाती घेण्यात आली होती. रिकाम्या गोण्यात माती टाकून बांध घालून अडविण्यात आलेले पाणी आजही वनराई बंधाऱ्यात कायम आहे. दुसरीकडे, हरसूल भागातील टंचाईवर मात करणे शक्य व्हावे, तालुका पाणी टंचाईमुक्त व्हावा, यासाठी मोठय़ा प्रमाणात लहान, मोठे सिमेंट बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच पाझर तलावही बांधण्यात आले.

जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच निर्मिती करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या अशा बंधाऱ्यात पाण्याचा खडखडाट पहावयास मिळत आहे.  जल परिषदेने निर्मिती केलेल्या वनराई बंधाऱ्यात आजही काही ठिकाणी पाणी आहे. यामुळे वनराई बंधारे उन्हाळय़ात भेडसावणाऱ्या टंचाईच्या काळात परिसरासाठी जीवनदायी ठरत आहेत. तसेच काही गावांना धार्मिक विधी, नेहमीच्या वापरासाठी, जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहेत. विशेष म्हणजे रिकाम्या गोण्यात माती टाकून अडविण्यात आलेले पाणी भर उन्हाळय़ातही तग धरून आहे, दुसरीकडे, कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी न थांबण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामाकडे संशयाची सुई जात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टंचाईची ही मोठी शोकांतिका आहे, असेच म्हणावे लागेल.

वनराई बंधाऱ्यात उन्हाळय़ातही जलसाठा असल्याने जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. जमिनीत पाण्याची पातळी आणि पशु- पक्ष्यांसाठी उपलब्ध जलसाठा तसेच ग्रामस्थांना धार्मिक कार्यक्रमासाठी हे बंधारे उपयुक्त ठरत असल्याने गाव तेथे वनराई बंधारा मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे याचे समाधान वाटते.

– पोपट महाले (जल परिषद)