नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आठ लाख महिलांना बाहेर काढण्यात आले. इतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना सरकारला ई-केवायसी करता न येणे हे हास्यास्पद असून, ते यंत्रणेचे अपयश आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे लाभार्थी झाले, सरकारी कर्मचारी कसे समाविष्ट झाले, याचे लेखापरीक्षण झाले पाहिजे. त्यासाठी सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
शनिवारी खा. सुळे यांच्या हस्ते येथे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लाडकी बहीण योजनेसह महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकणारी तरुणाई, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहार, राज्यातील वाढती अंधश्रद्धा, शेतकरी कर्जमाफी आदी विषयांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
महाराष्ट्रात बुवाबाजी आणि अंधश्रद्धा वाढत असून, त्याविरोधात कायदा करूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. बुवाबाजीमुळे महिलाच सर्वाधिक भरडल्या जात असल्याचे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली; मात्र आजतागायत तिची अंमलबजावणी झालेली नाही.
राज्यात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी असून, पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून त्यांनी, हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे स्थान असून, सरकारला याबाबत उत्तर द्यावे लागेल. श्रीराम मंदिरासाठी भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी लढा दिला. अशा ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल, तर यापेक्षा गलिच्छ, काही असू शकत नाही, असे नमूद केले.
‘केवळ मनसेमध्ये पाठवायचे बाकी’ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटल्यानंतर प्रसारमाध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)विषयी विविध चर्चा सुरू आहेत. पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्यापासून खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा होत आहे. यामुळे आपण व्यथित असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी पुरस्कार सोहळ्यात नमूद केले. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, माध्यमे आमच्या पक्षाच्या खासदारांना रोज वेगवेगळ्या पक्षांत पाठवत आहेत. आता फक्त मनसेमध्ये पाठवायचे बाकी राहिले आहे. मुळात आम्ही फुटण्यासाठी नव्हे, तर धोरणे ठरविण्यासाठी निवडून आलो आहोत. आमच्या एकाही खासदाराने उलटसुलट विधाने केलेली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
