खासदार सुप्रिया सुळे यांचा सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कायम निवडणुकीच्या धुंदीत राहणाऱ्या भाजप सरकारने आता थोडीफार जनतेचीही सेवा करावी. घोषणा भरपूर होतात. परंतु, प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. नांदेड महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. परंतु, अशोक चव्हाण यांनी प्रामाणिकपणे केलेले काम आणि काँग्रेसचे योगदान यावर मतदारांनी विजयाची मोहोर उमटवली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शुक्रवारी सुळे यांनी येथे महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्यांवरून भाजपवर टिकास्त्र सोडले. भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यात सर्व पातळीवर चुकीचे व्यवस्थापन आहे. अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्यास फौजदारी कारवाईचा इशारा दिला जातो. काँग्रेस आघाडीच्या काळात देण्यात आलेली कर्जमाफी शेतकरी वर्गाला सुखावणारी होती. भाजप सरकारने शेतकऱ्यांना आनंदाने कर्जमाफी दिलेली नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील, तो दिवस खरा दिवाळीचा असेल असे त्यांनी सूचित केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम एक ते दोन वर्षांपासून रखडलेली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटीमुळे रोजगार निर्मितीत घट झाल्याचे आकडे सांगतात. हा कर भरण्यास विलंब झाल्यास व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाईची धमकी दिली जाते. मुळात कर प्रणालीत बदल होत असताना त्याच्या अंमलबजावणीस पुरेसा कालावधी देण्याची गरज आहे. काही बाबींवर २८ टक्के कर लावण्यास आमचा विरोध होता. नव्या कराच्या अंमलबजावणीतील परिणाम समोर आल्यावर केंद्र सरकारला बदल करणे भाग पडणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule target bjp over nanded municipal elections result
First published on: 14-10-2017 at 04:48 IST