धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत निवडणुकीच्या तोंडावर जाणूनबुजून अजित पवार यांच्यावर आरोप करण्यासाठी त्या पुन्हा सक्रिय झाल्याचा आरोप केला. धुळ्यात दिलेल्या प्रतिक्रिया­त चव्हाण यांनी दमानिया यांना “रिचार्जवाल्या ताई” अशी उपमा देत त्यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले.

सुरज चव्हाण म्हणाले की, अंजली दमानिया या जाणीवपूर्वक अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी सक्रिय केल्या जात आहेत. त्यांचा रिचार्ज इतका मोठा आहे की, “अजित दादांच्या राजीनाम्यासाठी त्या गरज पडल्यास डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील भेटतील”, असा टोला त्यांनी लगावला. जर दमानिया यांची अमित शाह यांच्याशी भेट झाली नाही, तर त्यांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनाही भेटून त्यांच्याकडूनही राजीनामा मागावा, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

अजित पवार आणि पवार कुटुंबावर सतत आरोप करणाऱ्या दमानिया यांना “सुपारीबाज व्यक्तिमत्त्व” असे संबोधत चव्हाण यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील अनेक घटनांवर त्या मौन बाळगतात, परंतु अजित पवारांना बदनाम करण्यासाठीच सक्रिय होतात. “त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दमानिया यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांबाबत सुरज चव्हाण यांनी त्यांना थेट आव्हान दिले. “त्यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत. आमच्याकडून काही चुकीचे घडलेले नाही,” असे ते म्हणाले. दमानिया यांच्याकडून सातत्याने सणसणीत आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी चव्हाण यांनी असा दावा केला की, दमानिया यांचे काही घोटाळे त्यांच्या जवळ असून ते लवकरच जनतेसमोर आणले जातील. “त्यांचा रिचार्ज संपेपर्यंत त्या राष्ट्रवादीवर टीका करत राहतील. रिचार्ज असेपर्यंत आरोपही सुरूच राहणार,” असे त्यांनी उपरोधाने म्हटले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्ष्यवेधी ठरू लागल्या आहेत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची भाषणे,आरोप – प्रत्यारोप यांमुळे राजकीय वातावरण धवळून निघूलागले आहे. अनेक ठिकाणी प्रचार सभा गाजू लागल्या आहेत.

सुरज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर स्थानिक पातळीवरही मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही समर्थकांनी त्यांच्या विधानाला दमानिया यांच्या ‘राजकीय स्टंट’ विरुद्धची कडवी भूमिका असल्याचे म्हटले, तर विरोधकांनी चव्हाण यांच्या भाष्याला ‘अतिरेक’ ठरवत राजकीय संवादाची पातळी खालावल्याची टीका केली. शहरातील राजकीय वर्तुळात मात्र या वक्तव्याची जोरदार चर्चा होत असून आगामी सभांमध्ये दोन्ही बाजूंनी या मुद्द्यावर अधिक खुमासदार टोलेबाजी पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि इतर पक्षांमधील निवडणूक चढाओढ जोर धरत असून अशा वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्येही तापलेले वातावरण आणखी पेट घेण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरही चव्हाण आणि दमानिया यांच्यातील वादावर तिखट प्रतिक्रिया उमटत असून, आरोप- प्रत्यारोपांच्या या नवीन फेरीमुळे निवडणुकीचा प्रचार अधिक रंगतदार झाला आहे. आगामी काळात दोन्ही बाजूकडून आणखी जोरदार उत्तरं व प्रतिउत्तरं येण्याची राजकीय पाटी सूचित करत आहे. धुळ्यातील या प्रतिक्रियेमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.