जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये जुगलबंदी रंगली असताना, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश यांनी योग्य उमेदवार निवडून देण्याचे आवाहन येथे नागरिकांना केले. तसेच, आम्ही जळगावला सिंगापूर आणि पॅरिस बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, आज या शहराची अवस्था एखाद्या खेड्यासारखी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री जैन यांनी एसडी-सीडमार्फत उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जळगाव शहराच्या बकालपणाविषयी सुद्धा चिंता व्यक्त केली. त्याच प्रमाणे निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना विकासाची दृष्टी ठेवण्याचा आणि नागरिकांना योग्य व्यक्ती निवडून देण्याचा सल्ला दिला.

जळगाव शहराच्या विकासासाठी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुमारे २०० कोटींचा निधी नियोजन समितीमधून उपलब्ध केल्याचा दावा नुकताच केला. यापूर्वी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनीही जळगाव शहरासाठी राज्य सरकारकडून रस्त्यांसह इतर विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचे म्हटले आहे. परंतु, जळगावमध्ये ठोस विकासाच्या नावाने अजुनही बोंबच आहे.

जळगाव शहराची एखाद्या खेड्यासारखी झालेली अवस्था लक्षात घेता माजी मंत्री जैन यांनी मंत्री गुलाबराव पाटील आणि महाजन यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला. विकासाचे व्यवस्थित नियोजन केल्यास जळगाव शहराचे रूप अजुनही पालटू शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. १९८० ते २०१४ या कालावधीत जैन यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक वेळा पक्ष बदलले.

परंतु, प्रत्येक वेळी मतदारांनी त्यांना जळगावमधून सहजपणे निवडून दिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना, या काही पक्षांकडून जळगावमधून सलग नऊ वेळा मोठ्या मताधिक्याने विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा विक्रम त्यांनी केला होता. जळगाव महापालिकेची १७ मजली प्रशासकीय इमारत त्यांच्याच प्रयत्नांनी उभी राहिली. शहरात व्यापारी संकुलांचे जाळे विणले गेले.

दुर्दैवाने, माजी मंत्री जैन यांना जळगाव घरकूल गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली. कारागृहातूनच त्यांनी २०१४ ची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढली. अर्थात, ती त्यांची शेवटची निवडणूक ठरली. जळगाव शहरावर भाजपची सत्ता आली. तेव्हापासून ते सक्रीय राजकारणापासून दूरच आहेत. गेल्या वर्षी भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

जळगाव शहरातील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) दोन माजी महापौरांसह डझनभर माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करणारे सर्व दिग्गज हे माजी मंत्री जैन यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे जैन यांच्या पाठिंब्याशिवाय हे प्रवेश घडून आलेले नाहीत, अशी चर्चा आहे.