scorecardresearch

सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वेगवेगळ्या कारणांमुळे संघर्ष होत आहे

सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”
सुषमा अंधारे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (संग्रहित फोटो)

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वेगवेगळ्या कारणांमुळे संघर्ष होत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लवकरच शिंदे सरकार पडणार आहे, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. तर आमचे सरकार पडणार नसून आगामी काळतही आमचीच सत्ता येईल असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठे विधान केले आहे. राज्यात २०२३ सालात मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. शिंदे गटातील अनेक नेते नाराज आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हेही वाचा >>> राज्यपालांना हटवण्याच्या मागणीवरून राऊतांची सरकारवर टीका,’ सुधीर मुनगंटीवार म्हणाले “अल्टिमेटम देण्याचा…”

“नाशिकमधील सुहास कांदे नाराज आहेत. औरंगाबादेतील संजय शिरसाट हे नाराज आहेत. शिंदे गटातील नाराजांची संख्या फार मोठी आहे. ज्या-ज्या लोकांना घेऊन गेले होते, त्या सर्वांनाच मंत्रीपदाची गाजरं दाखवण्यात आली होती. मात्र या सर्वच लोकांना संतुष्ट करणे एकनाथ शिंदे तसेच भाजपाला अशक्य आहे. भाजपाची स्थिती घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं, अशी झाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार बडबड करत मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर आले होते. त्यांचा हा व्हिडीओ सर्वांनीच पाहिला असेल. प्रताप सरनाईक हेदेखील मुख्यमंत्र्यांवर चिडले होते. प्रताप सरकारनाईक, गीता जैन आणि नरेंद्र मेहता या तीन नेत्यांनी मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या एका बैठकीत एकमेकांना बसायला खुर्च्या दिल्या नाही. त्यामुळे २०२३ साली मध्यावधी निवडणुका लागतील हे नक्की,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा >>> ‘तर उठाव होणारच!’ राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत संभाजीराजेंचा इशारा, म्हणाले “भावना समजत नसतील तर…”

एका जुन्या व्हिडीओचा आधार घेत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेलाही अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचे खंडन-मंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 14:30 IST

संबंधित बातम्या