नाशिक – महिलेवर अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात या ज्योतिषाला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खरातच्या मागे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या छत्री घेऊन उभ्या असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित करीत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांना लक्ष्य केले आहे.
याबाबत समाज माध्मयात सुषमा अंधारे यांनी माहिती देत चाकणकर यांच्यावर आरोप केले. संशयित अशोक खरातने महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयिताने गुंगीचे औषध देऊन आणि पतीला जिवे मारण्याची धमकी देत हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. नाशिक गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने खरातला अटक केली. संशयित खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांची रिघ लागत असते.
खरातच्या अटकेनंतर शिवसेनना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत संशयिताच्या मंदिराशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे संबंध असल्याची तोफ डागली. समाज माध्यमांवर या संदर्भातील चित्रफिती प्रसारित केल्या. संशयित अशोक खरातच्या वाढदिवसाला त्याचा गुणगौरव करताना पितृतुल्य गुरूमाऊली अ्सा उल्लेख चाकणकरांनी केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. इतकेच नव्हे तर, एका कार्यक्रमात संशयित खरातची पाद्यपूजा महिला आयोग करीत असेल, अशा व्यक्तीच्या डोक्यावर छत्री धरणार असेल तर शोषित महिला कुणाकडे दाद मागणार, असा प्रश्न अंधारे यांनी केला.
संशयित अशोक खरातची नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे श्री शिवानिका संस्थान नामक संस्था आहे. या संस्थानच्या कार्यकारी मंडळात रुपाली चाकणकर यांचा समावेश असल्याची यादी अंधारे यांनी प्रसारित केली. त ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्त्तांची नावे. अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या अघोरी पूजा करणे, स्वत:च्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग केल्याची चर्चा आहे.
यापूर्वी खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत संबंधित संस्थेवर दबाव आणून माफीनाफा घेतल्याचा आरोप अंधारे यांनी केला. आता पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, अशी साशंकता व्यक्त करत अशा व्यक्तीला पाठिशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे का, असा प्रश्न अंधारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उद्देशून केला आहे.
