‘रॅगिंग’ झाल्याची नातेवाईकांची तक्रार

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळलेल्या डॉ. स्वप्निल शिंदे या विद्यार्थ्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वरिष्ठ विद्यार्थिनींकडून स्वप्निलचे रॅगिंग केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बुधवारी नातेवाईकांनी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, मयत विद्यार्थ्यांवर मानसिक आजारामुळे उपचार सुरू होते. त्याने ‘रॅगिंग’बाबत लेखी तक्रार दिली नसल्याचे महाविद्यालयाने म्हटले आहे.

डॉ. स्वप्निल हा आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षांत शिक्षण घेत होता. महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात मंगळवारी सकाळी प्रसाधनगृहात तो बेशुद्धावस्थेत आढळला. ही बाब लक्षात आल्यावर कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. औषधोपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेची माहिती समजल्यानंतर डॉ. स्वप्निल यांचे नातेवाईक बीड येथून शहरात आले. रॅगिंगमुळे ही घटना घडल्याची तक्रार त्यांनी केली. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी आडगाव पोलीस ठाण्यात गेल्यावर आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, अशी तक्रार नातेवाईकांनी केली. नंतर पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी गेलो असता तिथेही तोच अनुभव आल्याचे सांगत संतप्त नातेवाईकांनी आयुक्तालयासमोर ठिय्या दिला. तेव्हा पोलिसांनी त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार राहुल रक्षे यांनी केली. सायंकाळी काही नातेवाईकांना आयुक्तांना भेटण्यासाठी प्रवेश देण्यात आला. दरम्यान, वरिष्ठ विद्यार्थिनींकडून त्रास दिला जात असल्याने फेब्रुवारीत डॉ. स्वप्निलने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा आणि आताही मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत याबाबत माहिती दिली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. डॉ. स्वप्निलला जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

रॅगिंगची तक्रार नाही

डॉ. स्वप्निल शिंदे या विद्यार्थ्यांने रॅगिंगबाबत महाविद्यालयास कधीही लेखी तक्रार दिली नाही. पहिल्या वर्षी डॉ. स्वप्निलला नैराश्याने ग्रासल्याचे उघड झाले होते. महाविद्यालयाच्या मानसिक आरोग्य विभागाकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. फेब्रुवारीमधील घटनेनंतर कुटुंबीयांना बोलावून त्याला घरी पाठविण्यात आले. कुटुंबीयांनी केलेल्या तपासणीत ती बाब स्पष्ट झाली होती. दीड महिन्यांपूर्वी तो पुन्हा महाविद्यालयात आला. व्यवस्थापनाने आईला त्याच्यासोबत राहण्याचे बंधन घातले. डॉ. स्वप्निल आईसमवेत वास्तव्यात होता.

डॉ. मृणाल पाटील (अधिष्ठाता, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय)

नाशिक पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या दिलेले मयत विद्यार्थ्यांचे नातेवाईक.