नाशिक : जगात वेगवेगळे धार्मिक पंथ, संस्था, संघटना, पक्ष असतानाही आपल्या सेवाभावी आणि सामाजिक कार्यासाठी संपूर्ण जगात ओळख निर्माण करणारा स्वाध्याय परिवार वेगळाच. कोणत्याही कर्मकांडाला स्थान न देणाऱ्या स्वाध्याय परिवारात रक्षाबंधन या सणाचे एक वेगळे महत्व आहे. २८ ऑगस्ट रोजीचा रक्षाबंधन सण स्वाध्याय परिवारासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

विशेषत्वाने आयोजक जिल्हा म्हणून नाशिकवर रक्षाबंधन उत्सव जल्लोषात आणि गौरवात पार पाडण्याची जबाबदारी आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पदमविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांची कन्या आणि स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर यांची प्रमुख उपस्थिती नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या रक्षाबंधन उत्सवास लाभणार असून त्यांचे स्वागत या उत्सवात अनोख्या पध्दतीने होणार आहे.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील चारोसे या गावात दुपारी तीन वाजता स्वाध्याय परिवाराच्या वतीने रक्षाबंधनाचा उत्सव साजरा होणार आहे. चारोसे या गावातील मैदानावर होणाऱ्या या रक्षाबंधन उत्सवासाठी जय्यत तयारी केली जात आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, मालेगाव या ठिकाणांहून जवळपास ११ हजार ५०० स्वाध्यायी बंधू- भगिनी आसपासच्या १६५० आदिवासी गाव-पाड्यांमध्ये दोन वर्षांपासून सातत्याने जात आहेत. निरपेक्षपणे आदिवासींना आत्मियतेने भेटत आहेत. आणि हजारो आदिवासी बंधू-भगिनींशी एक निर्मळ नि:स्वार्थ नाते बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या सर्व आदिवासी बंधू-भगिनींना भेटण्यासाठी धनश्री तळवलकर (दीदी) यांचे २८ ऑगस्ट रोजी चारोसे या गावी आगमन होणार आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हजारो स्वाध्यायी युवक-युवती एका विशेष नृत्यगीताव्दारे दीदींना मानवंदना देणार आहेत. दीदींचे प्रवचन या उत्सवाचा केंद्रबिंदू असणार आहे.

प्रामुख्याने ज्या आदिवासींशी भावपूर्ण संबंध बांधला गेला आहे, ते नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव या ठिकाणचे हजारो आदिवासी बंधू-भगिनी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आदिवासींबरोबर साजरे होणारे हे एक विशेष रक्षाबंधन आहे. तसेच हृदयस्थ भगवंतांचा आणि दैवी भ्रातृभावाचा विचार ‘भक्तिफेरी’ च्या माध्यमातून सातत्याने अनेक वनवासी गावांमध्ये निरपेक्षपणे पोहचवून आलेले हजारो स्वाध्यायीही या आदिवासी बंधू-भगिनींबरोबर या  उत्सवासाठी एकत्र येणार आहेत.

पांडुरंगशास्त्रींनी दैवी भ्रातृभावाच्या नात्याने एक वैश्विक स्वाध्याय परिवार निर्माण करुन बंधू-भगिनींच्या नात्याला विश्वव्यापक बनवून रक्षाबंधनाचा गौरव वाढविला आहे. तसेच संस्कृतीच्या रक्षेची बंधन स्वीकारणारी लाखो माणसे घडवून त्यांना संस्कृतीच्या कार्यासाठी निरपेक्ष काम करण्याची प्रेरणा दादांनी दिली आहे. परंतु, आज रक्षाबंधन या भाऊ-बहिणीच्या निर्मळ उत्सवात काहीशी यांत्रिकता आणि रुक्षता आली आहे. स्वाध्याय परिवाराला या संबंधाला एक दैवी परिणाम द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि केवळ भाऊ-बहिणच नव्हे तर, सर्व संबंधांचे उदात्तीकरण, उर्ध्वीकरण करायचे आहे. त्यासाठी स्वाध्याय परिवार एका आगळ्या पध्दतीने रक्षाबंधनाचा उत्सव गेली अनेक वर्षे साजरा करत आहे. स्वाध्याय परिवाराच्या दृष्टीने नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथे साजरा होणारा रक्षाबंधन उत्वस सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.