नाशिक : येथील स्वरांजली संगीत संकुल संस्थेच्यावतीने रविवारी स्वर पालवी-सन्मान दश कलांचा या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून एकाच रंगमंचावर १० विविध कलाकृतींचा आविष्कार यानिमित्त अनुभवयास मिळणार आहे. अशा प्रकारचा शहरातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये ४० हून अधिक स्थानिक महिला कलावंत सहभागी होत आहेत.
स्वरांजली संगीत संकुल संस्थेच्या सुवर्णा क्षीरसागर यांनी ही संकल्पना मांडली आहे. नव्या पिढीपासून ज्येष्ठांपर्यंत अश्या सर्वाच्याच मनातली नव पालवी फुलविणारा हा सोहळा रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता परशुराम सायखेडकर नाटयगृहात रंगणार आहे. या अनोख्या उपक्रमास प्रशांत जुन्नरे यांच्या बाबाज थिएटर्सचे सहकार्य लाभले आहे. या प्रयोगात नृत्य, नाटय़, गायन, वादन, अभिवाचन, काव्य, कथा, रंगावली, शिल्पकला, चित्रकला अश्या १० कलाकृती एकाच रंगमंचावर सादर होतील. म्हणजेच ज्यास जे जे हवे ते ते सर्व काही देण्याचा प्रयत्न एकाच कार्यक्रमातून करण्यात आला आहे. प्रत्येकाची आवड भिन्न असली तरी तिचे दर्शन या कार्यक्रमात होऊ शकेल. त्यामुळेच नाशिककर रसिकांसाठी ही एक संगीतमय आगळी-वेगळी पर्वणीच म्हणावी लागेल. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम शहरात होत असून त्यासाठी स्थानिक महिला कलावंतांचाच समावेश असणे ही नाशिककरांसाठी विशेष आनंददायक गोष्ट म्हणावी लागेल.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नाशिककरांमध्ये गायिका मीना परुळकर-निकम, रसिका नातू, भार्गवी कुलकर्णी, कथक – सुमुखी अथणी, भरतनाटय़म् – सोनाली करंदीकर आणि दिपाली सुरळीकर, की बोर्ड – रागेश्री धुमाळ आणि कृपा परदेशी, बासरी – सानिका जोशी, सतार – ज्योती डोखळे, सुनीता देशपांडे, संबळ-हलगी-दिमडी – मोहिनी भुसे, तबला – राधिका रत्नपारखी-गायधनी आणि वैष्णवी भडकमकर, गिटार – पूजा पाठक-शुक्ला, ऑक्टॉपड – प्रिया वझे, अभिवाचन – पल्लवी कुलकर्णी, लेखिका – दीप्ती जोशी, कवयित्री भाग्यश्री गुजर, चित्रकार समृद्धी चिखलीकर, अभिनेत्री प्राजक्ता प्रभाकर, रंगावली – पूजा बेलोकर, शिल्पकार शुभांगी बैरागी, व्हायोलीन चिन्मयी जोशी, हार्मोनियम आणि व्हायोलीन – सुवर्णा क्षीरसागर या आपली कला सादर करणार आहेत.
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ. रंजना कुलकर्णी, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका हेमा नातू आणि दसककर भगिनी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून नाशिककर रसिकांनी या वेगळय़ा कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.