scorecardresearch

भोंग्यावर चर्चा पण, अन्नपाण्याविषयी सर्वच गप्प!; गिरणा गौरव पुरस्कार सोहळय़ात रामदास फुटाणे यांचे प्रतिपादन

भोंग्यासारख्या विषयावर सध्या चर्चा रंगते. परंतु, जनतेला अन्न, पाणी देण्यास आपण समर्थ आहोत काय, याविषयी सर्वच राजकीय पक्ष गप्प असतात, अशी टीका ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केली आहे.

(नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात गिरणा गौरव पुरस्कार्थीसमवेत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, स्मार्ट सिटीचे सुमंत मोरे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार आदी (छाया : यतीश भानू))

नाशिक: भोंग्यासारख्या विषयावर सध्या चर्चा रंगते. परंतु, जनतेला अन्न, पाणी देण्यास आपण समर्थ आहोत काय, याविषयी सर्वच राजकीय पक्ष गप्प असतात, अशी टीका ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केली आहे. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळय़ा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून फुटाणे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना फुटाणे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राजकीय पक्षांच्या भूमिकेवर मत मांडले. वारा ज्या दिशेने वाहत असेल, त्या दिशेने राजकारणी उफणत असतात. भोंगा कितीही मोठा असला तरी राम नाम सत्य आहे, हेच खरे, असेही फुटाणे यांनी सांगितले. वेगवेगळय़ा प्रकारचे प्रदूषण असतानाही त्यावर कोणी बोलत नाही. परंतु, दुसऱ्याच मुद्यांना राजकारण्यांकडून महत्व दिले जात असल्याबद्दल फुटाणे यांनी खंत व्यक्त केली. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नद्यांच्या वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी आणि गिरणा या प्रमुख नद्यांचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. भारतात प्रदूषणाने नद्यांचे नुकसान होत आहे. प्रदूषणास अनेक घटक कारणीभूत असल्याचे दिसत असले तरी त्यांचा नैसर्गिक प्रवाह कायम राहाणे अत्यावश्यक आहे. त्याविषयी काम होणे गरजेचे असताना, इतर गोष्टींवरच पैसा खर्च केला जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी भुजबळ यांनी नदी प्रदूषणाचा विषय मांडत नदी स्वच्छतेची जबाबदारी आपणा सर्वाची असल्याचे मत मांडले. प्रारंभी आदिवासी नृत्य सादर झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘स्मार्ट सिटी’चे सुमंत मोरे, सुरेश चव्हाणके, ‘आनंद अॅाग्रो’चे उध्दव आहेर, ‘रुंगटा ग्रुप’चे निखील रुंगटा, नेमिचंद पोद्दार, ‘गिरणा गौरव प्रतिष्ठान’चे सुरेश पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक स्वाती पाचपांडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. पुरस्कार्थीमध्ये पोलीस अधीक्षक सचिन पाटील, साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सामाजिक कार्यकर्त्यां नीलिमा मिश्रा, डॉ. जगन्नाथ दीक्षित, शिवाजी मानकर, पत्रकार मिलिंद सजगुरे आदींसह ३८ जणांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Talk about rubbing salt my wounds statement ramdas phutane girna gaurav award ceremony amy

ताज्या बातम्या