scorecardresearch

आनंदवल्लीतील बहुचर्चित बांधकाम प्रथमदर्शनी पात्रालगत

आनंदवल्लीतील गोदावरी नदी परिसरातील बहुचर्चित बांधकाम प्रथमदर्शनी पात्रालगत असल्याचे दिसत असून भूमी अभिलेख विभागाची मोजणी, नकाशे यावरून पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

महापौरांसह नगरसेवक, अधिकाऱ्यांकडून पाहणी

नाशिक : आनंदवल्लीतील गोदावरी नदी परिसरातील बहुचर्चित बांधकाम प्रथमदर्शनी पात्रालगत असल्याचे दिसत असून भूमी अभिलेख विभागाची मोजणी, नकाशे यावरून पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे नदीपात्रालगतच्या बांधकामास चाप न लावल्यास पर्यावरणमंत्र्यांकडे दाद मागण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. आनंदवल्ली शिवारातील सव्‍‌र्हे क्रमांक ६५ मधील गोदावरी पात्रालगतच्या भूखंडावरील बांधकामाचा विषय दोन महिन्यांपासून गाजत आहे. प्रत्यक्ष स्थळपाहणी न करताच नगररचना विभागाने त्यास आभासी प्रणालीने परवानगी दिली. त्यामुळे गोदा पार्कसाठी आरक्षित जागा गायब झाल्याचे आरोप होत आहेत. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी हा विषय मांडत नगरचना विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. विकासक पात्रालगत िभत बांधत असून त्यामुळे बजरंगनगर आणि आनंदवल्ली भागास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, याकडे नगरसेवक विलास शिंदे आणि संतोष गायकवाड यांनी लक्ष वेधले होते.

या पार्श्वभूमीवर, जाहीर केल्यानुसार महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्थानिक नगरसेवक शिंदे, गायकवाड, सलीम शेख, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आनंदवल्लीतील गोदा पात्रालगतच्या बांधकामाची पाहणी केली. गोदावरी पात्रालगत १८ मीटर जागा गोदा पार्क आणि रस्त्यासाठी आरक्षित आहे. परंतु िभत उभारताना ही जागा शिल्लक ठेवली गेली नसल्याची तक्रार शिंदे यांनी केली. महापौरांनी बोटीतून पाहणी केली. प्रत्यक्षदर्शनी हे बांधकाम नदीपात्रालगत असल्याचे दिसते. तथापि, लगेचच कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य होणार नसल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणीनुसार विकासकाने जागा सोडली आहे की नाही याची पडताळणी करण्याची सूचना नगरचना विभागास करण्यात आली आहे. जागेच्या क्षेत्राच्या हद्दी आणि खुणा निश्चित झाल्यानंतर बांधकामाविषयी स्पष्टता होईल असे महापौरांनी नमूद केले.

..तर पर्यावरण विभागाकडे तक्रार

मनपाने गोदावरी पात्रालगत बांधकामांना परवानगी देऊन नियमांचे उल्लंघन केले आहे. नदीपात्र आणि निळय़ा रेषेत निवासी बांधकामांना प्रतिबंध आहे. गोदा पात्रालगतच्या बांधकामास चाप न लावल्यास पर्यावरण आणि नगरविकास विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार केली जाईल असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी दिला.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Talked building prima facie ysh

ताज्या बातम्या