नाशिक – प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेल्या तपोवनातील वृक्षतोडीला सर्व नाशिककरांचा विरोध आहे प्राणवायू देणाऱ्या तपोवनशी सर्वांची भावना जोडलेली आहे. प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांच्या भावनेशी खेळू नये. येथील झाडच नव्हे, तर एक फांदीही तुटू दिली जाणार नाही, असा निर्धार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी तपोवन येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वन भोजनाद्वारे तपोवन बचाव मोहिमेला पाठिंबा दिला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव नाशिकचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त, सह प्रभारी प्रदेश सचिव श्रुती मात्रे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल, प्रदेश काँग्रेसचे सचिव नगरसेवक राहुल दिवे यांची उपस्थिती होती. यावेळी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सत्ताधारी व प्रशासनाने तपोवनातील वृक्ष तोडून निसर्गाचा ऱ्हास करण्याचा जो घाट घातला आहे, तो ठेकेदारांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप केला.
या आंदोलनात सहभागी असणारे माजी सभागृह नेते राजेंद्र बागूल यांनी तपोवन परिसरात अनेक पशू-पक्षी जीवन जगत असल्याचे नमूद केले. या ठिकाणी ऋषीमुनींनी तपस्या केलेली आहे. हे केवळ वृक्ष नसून यात जीवनाची मूल्य जडलेली आहेत. प्रस्तावित वृक्षतोड नागरिक कधीही सहन करणार नाही. पुढील काळात आंदोलन उभे करून महाालिकेवर मोर्चा काढला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
प्रभारी ब्रिज किशोर दत्त व सहप्रभारी श्रुती मात्रे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने पाठिंबा जाहीर केल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष या आंदोलनामध्ये पक्षाची जोडे बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून साथ देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. युवक काँग्रेसच्यावतीने सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. नंतर प्रेरणा मित्र मंडळाच्या महिलांनी काठी-लाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. या महिलांनी आंदोलकांना लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले जाईल आणि वेळ पडल्यास लाठी-काठी घेऊन आंदोलन करू, असा इशारा दिला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तपोवनातील झाडांच्या अवतीभोवती बसून वन भोजनाचा आस्वाद घेतला. या ठिकाणी सातत्याने आंदोलन करणारे समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी व अन्य नागरिकही यात सहभागी झाले. कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
