नाशिक – टीसीएस बहुराष्ट्रीय कंपनीतील विनयभंग, अश्लील टिप्पणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित शफी शेख आणि रझा मेमन यांना न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयितांवर याच प्रकरणात आणखी काही गुन्हे दाखल आहेत.

प्रसिध्द अशा टीसीएस कंपनीत मागील चार वर्षांत महिलांवर अन्याय, अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, मांसाहार करायला भाग पाडणे, विशिष्ट प्रार्थना व उपवास करायला लावणे आदी प्रकार घडल्याचे उघड झाले. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध नऊ स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात दानिश शेख (३१) तौफिख अत्तार (३४), शाहरूख हुसैन कुरैशी (३४) रझा मेमन (३५), असिफ अन्सारी, शफी शेख आणि अश्विनी चैनानी (५१, लुलानगर, पुणे) यांना अटक झाली आहे.

सध्या हे संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील संशयित निदा खान मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. कारागृहात असणाऱ्या शफी शेख आणि रझा मेमन या दोघांना पीडितेशी शारीरिक जवळीक निर्माण करण्याच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संशयितांनी पीडितेच्या खासगी आयुष्याबाबत वारंवार चर्चा केली.

शफीने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. तर रजा मेमनने तक्रारदाराच्या शरीरावर अश्लील टिप्पणी केली. हे दोघे संशयित पीडितेशी अंगलट करायचे, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी एकाच वेळी गुन्हे घडले असताना गुन्हे नोंदवहीत सर्व गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी करायला पाहिजे, असा मुद्दा मांडला.

त्यावर सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता किरण बेंढभर यांनी प्रतिवाद केला. संशयितांची गुन्हा पद्धत जरी एकसारखी असली तरी पीडिता या वेगवेगळ्या आहेत. गुन्ह्याचा कालावधी आणि हकीकत वेगवेगळी आहे.

तसेच संशयित रजाविरुद्ध तीन आणि शफीविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. संशयिताचा भ्रमणध्वनी जप्त झाल्यानंतर आणखी काही गुन्हे अथवा इतर संशयितांचा सहभाग निष्पन्न होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सहानुभूती न दाखवता पोलीस कोठडी देण्याची मागणी बेंढभर यांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून संशयितांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

प्रकरण काय?

शहरातील टीसीएस बहुराष्ट्रीय कंपनीत मागील चार वर्षांत महिलांवर अन्याय, अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, मांसाहार करायला भाग पाडणे, विशिष्ट प्रार्थना व उपवास करायला लावणे आदी प्रकार घडले. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. यातील एक गुन्हा विवाहित युवकाने लग्नाचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आहे. तर पाच गुन्हे धार्मिक भावना दुखावल्याशी संबंधित आहेत. परजिल्ह्यातून नोकरीस आलेल्या युवकाच्या धर्मातराचाही प्रयत्न झाल्याचा एक गुन्हा आहे.