नाशिक – टीसीएस कंपनीतील विनयभंग आणि अश्लील टिप्पणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित शफी शेख आणि रझा मेमन यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत वाढ केली. संशयितांचे भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले असून त्यांचे तांत्रिक विश्लेषण तपास यंत्रणेकडून केले जाणार आहे. दरम्यान, फरार संशयित निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी नाशिकरोड न्यायालयात अर्ज दाखल केला असून, सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
बहुराष्ट्रीय टीसीएसच्या नाशिक प्रकल्पात गेल्या चार वर्षांपासून महिलांवर अन्याय, अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावणारे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध नऊ गुन्हे दाखल असून, यातील सात संशयित अटकेत आहेत. पीडितेशी शारीरिक जवळीक साधण्याच्या गुन्ह्यात संशयित रझा मेमन (३५) आणि शफी शेख (३६) पोलीस कोठडीत होते. त्यांच्या कोठडीची मुदत संपुष्टात आल्यानंतर शनिवारी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी पक्षातर्फे गुन्ह्यात समाविष्ट केलेल्या नव्या कलमाची माहिती देण्यात आली.
पीडितेने स्पष्टपणे मनाई केलेली असतानाही संशयित तिचा पाठलाग करायचे, तिच्यावर नजर ठेवायचे. तिच्याशी वारंवार जवळीक साधून अश्लील वागणूक दिल्याप्रकरणी गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम ७८ अन्वये वाढ करण्यात आली. महिलांचा पिच्छा पुरवण्याशी संबंधित हे कलम असून इंटरनेट व समाजमाध्यमांतून नजर ठेवण्याचाही त्यात अंतर्भाव आहे.
संशयित रझा मेमन आणि शफी शेख यांचे भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले आहेत. यातील समाजमाध्यमांवरील खात्यांचे पासवर्ड मिळवून तांत्रिक विश्लेषणासाठी त्यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता किरण बेंढभर यांनी मांडला. संशयितांनी कार्यालयात काम करणाऱ्या पुरुष व महिलांशी धार्मिक उद्देशाने गैरकृत्य केले, तसेच महिलांचा विनयभंग केला.
रझाविरुद्ध तीन, तर शफीविरुद्ध चार गुन्हे दाखल असून सखोल तपासासाठी संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. बचाव पक्षाने त्यास विरोध केला. भ्रमणध्वनीचा पासवर्ड मिळवण्यासाठी पोलिसांकडे सायबर यंत्रणा असून त्यासाठी कोठडीची गरज नसल्याचा दावा बचाव पक्षाचे वकील बाबा सय्यद यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत संशयितांना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
निदा खानकडून अटकपूर्व जामिनासाठी धडपड
शहरातील टीसीएस कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणातील फरार संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनासाठी नाशिकरोड न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल झाला आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होणार असल्याची माहिती संशयित निदा खानचे वकील बाबा सय्यद यांनी दिली. गेल्या २३ दिवसांपासून निदा खान फरार आहे.
