नाशिक – टीसीएस नाशिकमध्ये संशयित दानिश शेख, तौसिफ अख्तर आणि रझा मेमन हे कार्यालयावर नियंत्रण ठेवून होते. पुण्यातील सहायक महाव्यवस्थापक अश्विनी चैनानी त्यांना पाठिशी घालत होत्या, असा ठपका राष्ट्रीय महिला आयोगाच्या तथ्य शोधन समितीने ठेवला आहे. टीसीएसमध्ये पुणे आणि नाशिकसाठी एकच अंतर्गत समिती होती, जे पॉश कायद्याचे उल्लंघन आहे, असेही समितीने म्हटले आहे.

टीसीएस कंपनीत घडलेल्या घटनांची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापलेल्या तथ्य शोधन समितीचा ५० हून अधिक पानांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. समितीने एप्रिल महिन्यात,  नाशिकला भेट देऊन पीडिता, पोलीस व टीसीएसच्या अंतर्गत समितीच्या सदस्यांशी संवाद साधला होता. टीसीएसमध्ये व्यापक छळवणूक झाल्याचे या समितीचे निरीक्षण आहे. तसेच व्यवस्थेतील भीती, दोषी नेतृत्व, सुरक्षा त्रुटी, पॉश कायद्याचे उल्लंघन, पुणे व नाशिकसाठी एकच सामाईक समिती, माहितीचा अभाव, प्रशिक्षणाची कमतरता, प्रशासकीय अपयश आदी मुद्यांवर समितीने बोट ठेवले आहे.

कामाच्या ठिकाणी लैंगिक व मानसिक छळ आणि अधिकारांचा गैरवापर झाला. संशयितांनी नाशिकमधील टीसीएस युनिटवर प्रभावी ताबा मिळवला होता. त्यांच्याकडून महिला कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. विशिष्ठ धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असे. नोकरी जाण्याच्या भीतीने, सामाजिक प्रतिष्ठेपायी अनेक महिला तक्रार करण्यास घाबरत होत्या. तक्रार निवारणासाठी कोणतीही विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध नव्हती असेही अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कल्सटन्सी सर्व्हिसेसच्या व्यवस्थापनाला महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

निदा खानला न्यायालयीन कोठडी

टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात संशयित निदा खानला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ४० दिवसांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले होते. या गुन्ह्यात गेल्या शुक्रवारी नाशिकरोड सत्र न्यायालयाने तिला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.