नाशिक – टीसीएस कंपनीत पुरुष कर्मचाऱ्याला विशिष्ट धर्माची टोपी घालून प्रार्थना करायला लावणे, या संबंधीची छायाचित्रे व चित्रफिती प्रसारित करून धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात चार संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पाच मेपर्यंत वाढ केली आहे. धर्मांतरासाठी काही निधी पुरवला गेला का, संशयितांनी धर्माविषयी माहिती घेण्यासाठी वापरलेले लॅपटॉप, गॅझेट, संगणकीय विश्लेषण, संगणकीय ‘वेब हिस्ट्री’ आदींचा तपास करण्यात येणार आहे.

​टीसीएस नाशिक प्रकल्पात महिला लैंगिक शोषण, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आदी प्रकरणी दाखल नऊ गुन्ह्यांची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे. कंपनीतील पुरुष तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तौसिफ अत्तार (३७), दानिश शेख (३२), शाहरुख कुरेशी (३४) आणि रझा मेमन (३५) हे पोलीस कोठडीत होते. कोठडीची मुदत संपुष्टात आल्यानंतर शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यात नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. तक्रारदाराला दुखापत पोहोचवण्याच्या उद्देशाने संशयितांनी खाद्यपदार्थ व थंड पेयात काहीतरी गुंगीकारक पदार्थ मिसळून गुन्हा केला. या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत शोधायचा आहे. गुन्हा करताना वापरलेले लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक गॅझेट तपासून पुढील तपास करायचा आहे. संशयितांच्या बँक खात्याचे विवरणपत्र तपासून धर्मांतरासाठी काही ‘फंडिंग’ झाले का, याचा तपास करायचा असल्याचे मुद्दे मिसर यांनी मांडले.

​संशयीतांनी तक्रारदाराच्या कौटुंबिक अडचणीबाबत विचारणा करीत ‘ब्लॅक मॅजिक’ बद्दल माहिती दिली होती. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन इतर संभाव्य संशयीतांच्या सहभागाची शक्यता तपासणे, वाढीव कलमांबाबत तपास करण्यासाठी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. तपासातील प्रगतीची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायालयाने चारही संशयीतांच्या पोलीस कोठडीत पाच मेपर्यंत वाढ केल्याची माहिती मिसर यांनी दिली.

तांत्रिक व आर्थिक विश्लेषण

​संशयीतांनी धर्माबाबत माहिती घेण्याकरीता वापरलेल्या कॉम्प्युटरचे तांत्रिक विश्लेषण, कम्प्युटरची वेब हिस्टरी, सर्च हिस्टरी, सोशल मिडीया ॲप्लिकेशन, हाईड स्टोरेज, गुगल स्टोरेज इत्यादीचे सखोल विश्लेषण करण्याची आवश्यकता न्यायालयात मांडण्यात आली. संशयीताच्या बँक खात्याच्या विवरणासोबत केवायसी तपासणे, धर्मांतरासाठी काही वित्त पुरवठा झाला आहे का याचा तपास करायचा आहे.

संशयीतांविरूद्ध दाखल अन्य गुन्ह्यांचा ताळमेळ बघणे आणि वाढीव कलमाबाबत पुढील तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली.​ न्यायालयासमोर तपासात झालेल्या प्रगतीच्या अनुषंगाने कागदपत्रे व केस डायरी दाखवून पुढील कोठडीसाठी युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद विचारात घेऊन संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे.