शिक्षक असलेल्या एका माथेफिरू पित्याने त्याच्या दोन निष्पाप मुलांचा झोपेच्या गोळ्या देत गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी नाशिकमध्ये घडली. यावेळी तिसऱ्या मुलीचा जीव घेण्याचा तो प्रयत्न करत असताना घरी पोहचलेल्या मुलीच्या आईने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे तिसऱया मुलीचे प्राण वाचले. दरम्यान उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही मुलगी जीवित असून नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. दरम्यान हा प्रकार उघड होत असताना पित्यानेही स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये तो ६० टक्क्यांपेक्षा अधिक भाजला असून त्याच्यावरही उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

नाशिकरोड येथील जगताप मळा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील निवृत्ती बेलदार (वय ५०) हा पेशाने शिक्षक असून खासगी क्लास घेतो. सुनील व त्यांची पत्नी अनिता बेलदार (वय ४०) यांच्यात घरघुती वाद होता. हा वाद काही दिवसांपासून विकोपाला गेल्याने अनिता माहेरी गेल्या होत्या. दि. १२ एप्रिल रोजी त्या नाशिकला परत आल्या. आज (गुरुवारी) सकाळी अनिता ह्या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना सुनीलने त्यांचा मुलगा देवराज (वय ८), मुली वैष्णवी (वय १०) आणि संजीवनी (वय १२) या तिघांनाही त्यांच्या नकळतपणे झोपेच्या गोळ्या खावू घातल्या. दुपारदरम्यान सुनीलने बेशुद्ध अवस्थेतील मुलांना दोरीने गळा दाबून जीवे मारण्यास सुरुवात केली. यामध्ये देवराज व वैष्णवी या दोघांचा खून केल्यानंतर सुनीलने मुलगी संजीवनीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याचवेळी त्यांची पत्नी अनिता घरी आल्याने हा धक्कादायक प्रकार पाहून त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. दरम्यान उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत संजीवनीला नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले. दरम्यान हा प्रकार उघड होत असल्याचे लक्षात येताच सुनीलने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये तो ६० टक्क्यांपेक्षा जास्त भाजला असून त्याचावर उपचार सुरु आहेत. बिटको हॉस्पिटल येथे संजीवनीवर उपचार सुरु असून ती या उपचारांना प्रतिसाद देत आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक अहवाल तयार केला असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.