scorecardresearch

आजपासून दहावीची परीक्षा

दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून लेखी परीक्षा घेण्यात येत आहे.

मंगळवारपासून इयत्ता १० वीची परीक्षा सुरू होत असल्याने शहरातील केंद्रांवर विद्यार्थ्यांचे क्रमांक टाकण्याचे काम करण्यात आले.

जिल्ह्यात एक हजार २८० केंद्रे;  ९० हजाराहून अधिक परीक्षार्थी

नाशिक : दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. बारावीची परीक्षा सुरू असताना आता दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातून ९० हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. यासाठी एक हजाराहून अधिक केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

आभासी पद्धतऐवजी केंद्रांवर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. मर्यादित वेळेत संपूर्ण प्रश्नपत्रिका लिखित स्वरूपात सोडविण्याचा सराव सुटल्यामुळे प्रारंभी परीक्षेसाठी वेळ पुरेल की नाही, अशी साशंकता विद्यार्थ्यांना होती. हे ध्यानात घेऊन मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून दिला आहे. ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटांचा वेळ, ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात येणार आहे. अपंग विद्यार्थ्यांना प्रतितास २० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात येणार आहे.

याशिवाय शाळा तेथे परीक्षा केंद्र करण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावी परीक्षेसाठी यंदा जिल्ह्यातून ९३, ७०८ विद्यार्थी बसले आहेत. नियमित २०३ आणि एक हजार ७७ उपपरीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरू असताना कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथकांव्दारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सात भरारी पथके गठित करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद निरंतर, जिल्हा परिषद प्राथमिक, महिला अधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य, ज्येष्ठ अधिविख्याता जिल्हा व प्रशिक्षण संस्था हे पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवतील.

दरम्यान, परीक्षा केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर नियमितपणे इतर वर्ग सुरू  राहणार असल्याने र्निजतुकीकरण , स्वच्छता आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या काळात जर परीक्षार्थीस सर्दी, खोकला जाणवल्यास त्याला वेगळय़ा कक्षात ठेवण्यात येणार आहे.  यासाठी जवळच्या रुग्णालयाची मदत घेण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tenth examination from today centers candidates students ysh

ताज्या बातम्या