नाशिक – जगप्रसिद्ध गिर्यारोहक एव्हरेस्टवीर शेर्पा तेनझिंग नोर्गे हे नाव माहीत नसणारे फारच कमी गिर्यारोहक, गिरीभ्रमणकार, भटके असतील. शेर्पा तेनझिंग यांचे कार्यच माउंट एव्हरेस्टच्या उंचीचे. नुकतीच त्यांची ११२ वी जयंती जगभरात साजरी झाली. परंतु, नाशिक जिल्ह्यातील त्रिंगलवाडी या छोट्याशा किल्ल्यावरही तेनझिंग नोर्गे यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यामागील कारणही तसेच आहे.
प्रसिद्ध नेपाळी-भारतीय गिर्यारोहक तेनझिंग नोर्गे यांनी २९ मे १९५३ रोजी न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी यांच्याबरोबर जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले होते. त्यामुळेच सर एडमंड हिलरी यांच्याप्रमाणै माउंट एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले होते. ‘हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’च्या स्थापनेत तेनझिंग नोर्गे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांचे जन्मनाव ‘नामग्याल वांगडी’ असे असताना बौद्ध परंपरेनुसार लामाने त्यांचे नाव ‘तेनझिंग नोर्गे’ ठेवले. त्यांचा जन्म: २९ मे १९१४ रोजी नेपाळच्या खुंबू प्रदेशातील थामे गावात एका शेर्पा कुटुंबात झाला. पुढे प्रसिध्द गिर्यारोहक म्हणून त्यांना प्रसिध्दी मिळाली. गिर्यारोहकांना मदत करण्यात ते कायमच सक्रिय राहिले.
शेर्पा तेनझिंग नोर्गे यांची जयंती नुकतीच सर्वत्र साजरी करण्यात आली
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत MY Bharat, नाशिक कार्यालय आणि हेरिटेज साइट, कल्चरल अँड ॲडव्हेंचर एक्स्पिडिशन (मार्क मार्शल आर्ट्स, नाशिकची एक शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील त्रिंगलवाडी किल्ल्यावर तेनझिंग नोर्गे यांची जयंती तसेच एव्हरेस्ट डे च्या ७३ व्या वर्षानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्राचीन लेणी, मंदिरांमध्ये “वारसा पर्यटन अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम” झाले. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे ३, २३८ फूट उंचीवर वसलेला नाशिक जिल्ह्यातील त्रिंगलवाडी किल्ला हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. युवकांमध्ये वारसा संवर्धन, साहसी उपक्रम आणि पर्यटनाबाबत जागृती निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या मोहिमेत २४ उत्साही ट्रेकर्सनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास अभिलाष म्हस्के (जिल्हा युवा अधिकारी, MY Bharat, नाशिक) तसेच हसन सय्यद (पोलीस निरीक्षक, नाशिक) यांनी उपस्थित राहून सहभागींना प्रोत्साहन दिले.
या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे सहभागींची प्रेरणादायी वयोवैविध्यता. ७२ वर्षीय इद्रीस अहमद खान (माजी आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, इगतपुरी) हे सर्वात ज्येष्ठ सहभागी होते. तर अदिबा खान (गोल्डन होरायझन स्कूल, नाशिक) ही इयत्ता नववीची विद्यार्थिनी सर्वात लहान सहभागी ठरली. अदिबा खानने अवघे ५ वर्षे ३ महिने वय असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाईवर झेंड रोवला होता.
भारत सरकारच्या युवकांना वारसा पर्यटन, साहसी मोहिमा, नेतृत्व विकास आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. हा उपक्रम मोहम्मद आरिफ खान (संस्थापक – हेरिटेज साइट, कल्चरल अँड ॲडव्हेंचर एक्स्पिडिशन व मार्क मार्शल आर्ट्स, नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सानिया खान (अध्यक्ष, युवा विंग, मार्क मार्शल आर्ट्स, नाशिक) यांचे सहकार्य लाभले. अश्विन गोप कुमार यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. यानिमित्ताने सहभागींनी त्रिंगलवाडी किल्ला, प्राचीन लेणी आणि मंदिर परिसराचा अभ्यास करुन इतिहास, संस्कृती आणि पर्यावरणीय वारशाची माहिती घेतली.
