येवला: शहरासह ग्रामीण भागात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. तांदुळवाडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. शहर आणि तालुक्यातील इतर ठिकाणी ११ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या. मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढत असताना त्यांचा बंदोबस्त करण्याच्या कामात अडथळे आणणाऱ्या प्राणीमित्र संघटनेविषयी नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 काही महिन्यांपासून शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या धास्तीखाली वावरत आहेत. नववसाहतीत त्यांचा अधिक त्रास आहे. मागील आठवडय़ात शहरातील विठ्ठलनगर येथील बगीचाजवळ खेळणाऱ्या सहा वर्षांच्या बालकाच्या ओठाचा मोकाट कुत्र्यांनी लचका तोडला होता. अशा घटना वारंवार घडत आहेत. आता तांदुळवाडी येथील घटना समोर आली. नगर-मनमाड राज्य महामार्गावर तांदुळवाडी शिवारात एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना गंभीर जखमी केले. पिसाळलेल्या कुत्र्याने दिवसभरात मुक्या जनावरांनाही चावा घेतल्याचे सांगितले जाते. शहरासह तालुक्यातील सावरखेडा, अनकुटे आणि तांदुळवाडी फाटा या तीन गावात अशाच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वाना प्रारंभी जवळच्या सावरगाव येथे प्राथमिक उपचार करून येवला उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये संदीप कासलीवाल (कसारखेडे), संपत गोरे (सावरगाव), पुष्पा गोरे (सावखेडे), भूषण जवडेकर (अनकुटे), कमलेश गुजर (तांदुळवाडी), धनंजय गोरे, दीपक कोल्हे, मंगलबाई हिंगे, गणेश पुराणिक, भूषण तळेकर, कुरेशी, शाईन शेख, कमल मकवान, सचिन भागवत, प्रमिला भागवत (सर्व येवला), रामनाथ सोनार (करंजी), राम जैन (येवला), शेख आयुब (धामोरी) यांचा समावेश आहे. केवळ येवलाच नव्हे तर, जिल्ह्यातील इतर भागात अधूनमधून मोकाट कुत्र्यांकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

कुत्र्यांविरोधातील मोहीम कायद्याच्या कचाटय़ात

मोकाट कुत्र्यांच्या विरोधात येवला पालिकेने दिवाळीच्या सुमारास मोहीम राबविली होती. परंतु, ती कायद्याच्या कचाटय़ात अडकली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेने कुत्र्यांची धरपकडम् करणाऱ्या संस्थेला काम दिले होते. ती संस्था मोकाट कुत्र्यांना उचलून जंगलात सोडणार होती. त्यावर मुंबईच्या प्राणीमित्र संस्थेने हरकत घेत शहर पोलीस ठाण्यात पालिका प्रशासनाविरोधात तक्रार दिली. नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार न करता आक्षेप घेतला गेल्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त वादात अडकला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror dogs yeola eight injured injured elsewhere terror atmosphere ysh
First published on: 20-05-2022 at 00:02 IST