मालेगाव: राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणी सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. खुद्द शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गावातही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. याविषयी ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या पदाधिकाऱ्यांसोबत मालेगाव येथे घेतलेली बैठक चांगलीच वादळी ठरली. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या महाघोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत शिक्षणमंत्र्यांना दिला.
टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात गेल्या १ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली होती. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने या आंदोलनाप्रसंगी मंत्री भुसे मुंबईत होते. या आंदोलनाची दखल घेत, भुसे यांनी आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी मालेगाव येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विद्यार्थी नेते आणि शिक्षणमंत्र्यांमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शासनाने शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो उमेदवारांचे मोठे नुकसान होत आहे. या संपूर्ण अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी शिक्षणमंत्र्यांचीच असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी लावला.
या बैठकीदरम्यान संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्र्यांना एकूण १२ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि भविष्यात परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणे अशा मागण्यांचा समावेश आहे. येत्या आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिला. या बैठकीला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
‘..तर,मी स्वतः राजीनामा देईन!’
पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणावरून आजवर राज्यातील कोणत्याही मंत्र्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिलेला नाही. टीईटी पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री म्हणून राजीनामा दिल्यास, तो एक ऐतिहासिक निर्णय ठरेल,असे मत पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडले. यावर दादा भुसे यांनी शांत पण ठाम शब्दांत उत्तर देत, “राजीनामा द्यायचा असेल, तर त्यासाठी कोणाला सांगण्याची गरज नाही. योग्य वेळ आली तर मी स्वतःहून राजीनामा देईन,” असे वक्तव्य केले.
