नाशिक – एकसंघ शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर मुंबईत झालेल्या पहिल्याच मेळाव्यात नाशिकमधून मोठी रसद मिळाली होती. तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ राजकीयदृष्ट्या वेगळे झाले होते. शनिवारी जेव्हा हे ठाकरे बंधू विजयी मेळाव्यानिमित्त प्रथमच एकाच व्यासपीठावर आले, तेव्हा देखील नाशिकमधून उभय पक्षाच्या नेत्यांनी सुमारे ३०० वाहनांनी कार्यकर्त्यांची रसद मुंबईकडे नेल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही भावांचे एकत्र येणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या मेळाव्याने शिवसैनिक व मनसैनिकांना नवी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात दिलेल्या लढ्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी मुंबईत मेळाव्याचे आयोजन कऱण्यात आले होते. या मेळाव्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी वाहनांनी मुंबई गाठली.
मनसेचे काही पदाधिकारी हातात गुढी घेऊन सहभागी झाले. नाशिक प्रारंभी एकसंघ शिवसेनेचा प्रदीर्घ काळ आणि नंतर काही कालावधीसाठी का असेना मनसेचा बालेकिल्ला राहिला होता. या दोन्ही पक्षात काम करणारे अनेक नेतेही मुंबईत पोहोचले होते, मनसेचे माजी आमदार आणि आता शिवसेना ठाकरे गटात असणारे वसंत गिते हे त्यापैकीच एक.
मनसेची स्थापना झाली, तेव्हा त्यांनी राज ठाकरे यांना मोठी ताकद नाशिकमधून दिली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये मनसेचा विस्तार होऊन शहरातील तिन्ही मतदारसंघात पक्षाचे आंमदार निवडून आले. महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. या काळात एकसंघ शिवसेना व मनसेत स्थानिक पातळीवर अंतर पडले. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मनसेने एकदा भाजप व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. शिवसेनेची मदत मात्र त्यांनी घेतली नव्हती.
उभय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्या्मधील प्रदीर्घ काळापासून राहिलेला दुरावा विजयी मेळाव्याने संपुष्टात आला. मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव व राज ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकारी एकत्र आले. मागील काही दिवसांपासून संयुक्त बैठकांमधून केलेले नियोजन शनिवारी पहायला मिळाले. मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, दत्ता गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शेकडो वाहने मुंबईकडे मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात आले.
मेळाव्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याचे शिवसैनिक, मनसैनिकांंसह संपूर्ण राज्याने उत्स्फुर्त स्वागत केले. दोन्ही पक्षांना कळून चुकले आहे की, भाजपने आपला घात केला. आज मराठी माणसाने एकत्र येऊन आपली ताकद दाखवली. त्यामुळे राज्यात परिवर्तन घडेल, असा विश्वास माजी आमदार, वसंत गिते यांनी व्यक्त केला. व्यवसायासाठी आलेली परप्रांतीय मंडळी राजकारणासह सर्व क्षेत्रात शिरून मुजोर बनली. त्यांच्याकडून मराठीची गळचेपी सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.