लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : अंबड येथे अडीच वर्षांपूर्वी रिपाइं (आठवले गट) पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासणीत पोलीस शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजरला अटक करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांमार्फत त्याचा शोध सुरू असून तो फरार आहे. तक्रारदाराला धमकावण्यासाठी दीपकने सुपारी दिल्याचा संशय आहे. दुसरीकडे, ताब्यात घेतलेल्या एका संशयितास मारहाण करुन पोलीस त्याच्यावर जिल्हाप्रमुख बडगुजर वा त्यांच्या मुलाचे नाव घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.
रिपाइं गटाचे पदाधिकारी ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर अडीच वर्षापूर्वी उपेंद्रनगर भागात गोळीबार झाला होता. जाधव यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आकाश सूर्यतळ, श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या, सनी पगारे उर्फ टाक्या, अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे आणि मयूर बेत अशा सहा जणांना अटक केली. संशयित अंकुश हा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या जवळचा असल्याचे सांगितले जाते. तपासात अंकुशने प्रसादमार्फत मयूर बेतला पैसे दिल्याचे निष्पन्न झाले. संशयितांच्या जबाबात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांचा मुलगा दीपकचे यांचे नाव पुढे आले. तक्रारदाराला धमकावण्यासाठी त्याने ही सुपारी दिल्याचे यंत्रणेकडून सांगितले जाते. या प्रकरणात संशयित दीपकला ताब्यात घेतले जाणार आहे. पोलिसांमार्फत त्याचा शोध सुरू असून अद्याप तो मिळून आला नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आणखी वाचा- धुळे जिल्ह्यातील अपघातात पाच जणांचा मृत्यू
दरम्यान, संशयित अंकुश शेवाळेला कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण करून त्याला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व त्यांच्या मुलाचे नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची तक्रार शेवाळे कुटुंबियांनी केली. तक्रारदाराने शिवीगाळ करीत आम्हाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला.
आंदोलनाचा इशारा
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे महाराष्ट्र शासन व पोलीस यंत्रणा षडयंत्र रचत असून तडीपारीच्या नोटीस पाठवत असल्याचा आरोप ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत केला. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला लक्षणीय यश मिळाले. त्यामुळे सत्ताधारी सैरभैर झाले असून खोटे गुन्हे दाखल करण्याचे कारस्थान करीत आहेत. त्यांचा हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. या कारवाईच्या निषेधार्थ शहर व जिल्ह्यात सर्वत्र धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिला.
बडगुजर हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी शासनाने पोलिसांच्या माध्यमातून रचलेले षडयंत्र गंभीर बाब आहे. तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात सिडकोतील एका शिवसैनिकाला नाहक अडकविण्यात आले. त्याला अमानुषपणे मारहाण करून, मानसिक त्रास देऊन बडगुजर कुटुंबातील एका सदस्याचे या प्रकरणात नाव घेण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला गेला. या शिवसैनिकाने न्यायालयात सर्व कहानी कथन केल्याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले.