उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईचा जोर यामुळे राज्यातील एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवर आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. प्रामुख्याने रेल्वे गाड्यांच्या जनरल बोगी प्रवाशांनी खचून भरलेल्या असतात. या गाडीत बसताना आणि उतरताना गर्दीचा फायदा घेत चोऱ्या होण्याचे प्रमाण राज्यात वाढले आहे. अशाच प्रकारची एक चोरीची घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे जंक्शन येथे घडली.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात फलाट क्रमांक ४ वर मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण बोगीत प्रवेश करत असतांना अज्ञात व्यक्तीने एका महिलेच्या पर्सची चैन अलगद उघडून त्यातील १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व ७ हजाराची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. या घटनेमुळे रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंदना जगन केदारे (रा.मुकुंदनगर, उल्हासनगर, जि.ठाणे) यांच्या बाबतीत ही घटना घडली असून याप्रकरणी लोहमार्ग रेल्वे पोलिसांत त्यांनी फिर्याद दिली आहे. वंदना केदारे या येवला येथील आपल्या नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. हा कार्यक्रम आटोपून उल्हासनगर येथे जाण्यासाठी त्या आपल्या परिवारासह सोमवारी सकाळी ८ वाजता मनमाड ते कल्याण असा प्रवास करण्यासाठी रेल्वे फलाटावर आल्या. फलाट क्र.४ वर मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसच्या जनरल बोगीत चढल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्याजवळ असलेल्या पर्सची चैन उघडी आहे. त्यांच्या पर्समधील छोट्या पर्स व डब्यामधील चांदीचे कडे, सोन्याची अंगठी, सोन्याचे गंठण, नेकलेस, सोन्याचे वेल, कर्णफुले आणि रोख ७ हजार रुपयांची रक्कम असा एकुण १ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरीस गेला. अज्ञात चोराने त्या गाडीत चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून पर्सची चैन अलगद उघडून हा ऐवज चोरुन नेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.