अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील दुसऱ्या क्रमाकांची शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) शिक्षण संस्थेत शाळा, महाविद्यालयीन शिक्षिकांचा बदललेला गणवेश संबंधितांसह नव्या कार्यकारिणीला चांगलाच मनस्ताप देत आहे. जुन्या कार्यकारी मंडळाने लाखो रुपयांचे गणवेश (साडी) खरेदी केले. परंतु, त्यांची गुणवत्ता चांगली नसल्याने तो परिधान करण्यास शिक्षिका उत्सुक नाहीत. गणवेशासंदर्भातील आर्थिक व्यवहार आधीच पूर्ण झालेला असल्याने तो रद्द केल्यास खरेदी केलेल्या पाच हजार साड्यांचे काय करायचे, हा प्रश्न संस्थेपुढे आहे. त्यामुळे तूर्तास आहे तो गणवेश अपरिहार्यपणे स्वीकारण्याची वेळ संस्थेवर आली आहे.

हेही वाचा >>>… अन्यथा नाशिक-मुंबई महामार्गावरील टोल बंद ,खड्ड्यांची पाहणी केल्यावर छगन भुजबळ यांचा इशारा

संस्थेची जिल्ह्यात ४७ महाविद्यालये, ६३ उच्च माध्यमिक विद्यालये आणि ३४३ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. या ठिकाणी तब्बल साडेनऊ हजारहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेतील शिक्षिकांचा गणवेश बदलण्याचा निर्णय मागील कार्यकारी मंडळाने घेतला होता. त्यानुसार संस्थेच्या निवडणुका होण्यापूर्वी गणवेश (साडी) खरेदीचे घाईघाईत व्यवहार झाले. या गणवेशापोटी प्रत्येक शिक्षिकेला ९५० रुपये मोजावे लागले. शिक्षक वृंदाचा गणवेश बदलताना संस्थेने महिलांना एक आणि पुरूषांना मात्र वेगळा न्याय लावला. म्हणजे पुरूषांसाठी जुनाच गणवेश कायम ठेवला गेला. लाखो रुपये खर्चून शिक्षिकांसाठी तब्बल पाच हजार साड्या खरेदीचा व्यवहार केला. त्यापोटी बरीच मोठी रक्कमही पुरवठादाराला आगाऊ देण्यात आली. गणवेशाचे वितरण सुरू झाले, तसा तक्रारींचा ओघ सुरू झाला. याच काळात संस्थेत सत्तांतर झाले. वाढत्या तक्रारींमुळे नव्या सत्ताधाऱ्यांनी गणवेशास स्थगिती दिली. पुरवठादाराशी चर्चा केली. व्यवहार रद्द केल्यास संस्थेचे हात पोळणार होते. त्यामुळे खराब साड्या बदलून देण्याची सूचना पुरवठादाराला करण्यात आली. त्यानुसार आता खराब, त्रुटी असलेल्या साड्या बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

संस्थेतील शिक्षिकांची गणवेश म्हणून ब्लेझर, ओव्हरकोटची मागणी आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. त्यात शिक्षिकांना प्रतिनिधीत्व देण्यात आले. भविष्यात शिक्षकांचे गणवेश बदलण्याचा विचार आहे. तेव्हा या समितीमार्फत गणवेशाबाबत निर्णय होईल, असे संस्थेचे पदाधिकारी सांगतात. तूर्तास अलीकडेच प्राप्त झालेल्या गणवेशावरच (साडी) शिक्षिकांना शाळा, महाविद्यालयात ज्ञानदान करावे लागणार आहे.

हेही वाचा >>>भुसावळच्या माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक अपात्र ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का

हजारो शिक्षिका त्रस्त
बाजारात ३०० रुपयांत मिळणाऱ्या साडीसाठी संस्थेने ९५० रुपये आकारले. तिचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. शाळा, महाविद्यालयातून मिळालेल्या अनेक साड्या खराब होत्या. त्यात त्रुटी असल्याने गणवेश म्हणून ते परिधान करणे शक्य नसल्याच्या तक्रारी झाल्या. संस्थेने अखेरीस खराब, त्रुटीयुक्त साड्या बदलून देण्यासाठी गंगापूर रस्त्यावरील उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयात व्यवस्था केली. साडीची गुणवत्ता चांगली नसल्याने अनेक शिक्षिकांनी साडीचे पोषाखात रुपांतर केल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >>>सावधान… उपराजधानीत मुलांमध्ये हात, पाय, तोंडात कांजण्यासदृश्य पुरळ !

शिक्षिकांच्या गणवेशाबाबतचा संपूर्ण व्यवहार आधीच्या कार्यकारी मंडळाच्या काळात पूर्ण झाला होता. संबंधितांनी पुरवठादारास साड्यांची लाखो रुपयांची नोंदणी देतानाच आगाऊ रक्कम दिली. या साड्यांची गुणवत्ता फारशी चांगली नसल्याच्या तक्रारी झाल्यामुळे नव्या कार्यकारी मंडळाला काही काळ या गणवेशास स्थगिती द्यावी लागली. गणवेशाचा निर्णय रद्द केला असता तर संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. त्यामुळे तोच गणवेश स्वीकारण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. पुरवठादाराला खराब गणवेश बदलून देण्यास सांगण्यात आले आहे.– ॲड. नितीन ठाकरे (सरचिटणीस, मविप्र शिक्षण संस्था)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The change of mvp uniform caused grief to the executive along with the teachers amy
First published on: 19-10-2022 at 14:17 IST