नाशिक -भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक संघाच्या (स्कॅट) नऊ विमानांद्वारे पाच मीटरपेक्षा कमी अंतरावर मार्गक्रमण करीत सादर होणाऱ्या चित्तथरारक कसरतींनी आजवर लाखो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. जगभरातील नऊ सर्वोत्तम ॲरोबॅटिक संघामध्ये ‘सूर्यकिरण’चा समावेश होतो. ‘सदैव सर्वोत्तम’ हे ब्रीदवाक्य सिद्ध करणाऱ्या या संघाने भारतीय हवाई दलाच्या अफाट कौशल्य आणि व्यावसायिकतेचे नाशिककरांना दर्शन घडवले. अर्थात हे अद्वितीय कौशल्य लढाऊ वैमानिकांना सहजपणे प्राप्त झालेले नाही. त्यामागे कठोर परिश्रम आहेत.

भारतीय हवाई दलाचा सूर्यकिरण हा आशियातील एकमेव नऊ विमानांचा ॲरोबॅटिक संघ आहे. कोणत्याही एरोबॅटिक संघात नऊ विमानांची ही सर्वाधिक संख्या आहे.

सूर्यकिरण संघाची १९९६ मध्ये स्थापना झाली. आजवर या संघाने देश-विदेशातील ७५० हून अधिक ॲरोबॅटिक शोमध्ये सहभाग नोंदविला आहे. या संघात लढाऊ वैमानिक, अभियंता आणि कुशल तंत्रज्ञ यांच्यासह १५० जणांचा समावेश आहे. चित्तथरारक कसरतींमध्ये वैमानिकाची एकाग्रता, समन्वय आणि क्षमतेची कसोटी लागते. काळजीपूर्वक निवड, व्यापक प्रशिक्षण आणि नेत्रदीपक सांघिक कामगिरीचा हा एक कठीण मार्ग आहे. या पथकात समाविष्ट होणे वैमानिकांसाठी अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. भारतीय हवाई दलातील सर्वोत्तम लढाऊ वैमानिकांमधून सर्यकिरण संघासाठी निवड केली जाते. ही निवड होण्यासाठी संबंधित वैमानिकाने भारतीय हवाई दलात किमान १० वर्ष वैमानिक म्हणून सेवा केलेली असणे अनिवार्य असते, असे सूर्यकिरण संघाच्या जनसंपर्क अधिकारी कवल संधू यांनी सांगितले.

किमान एक हजार तास उड्डाणाचा अनुभव असणाऱ्या वैमानिकांची कामगिरी आणि व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन केले जाते. निवडलेले वैमानिक सहा महिने ७० ते ७५ उड्डाणे करून विविध कसरतींचा सराव करतात. वैमानिकांचा कार्यकाळ सुमारे तीन वर्षांचा असतो. साधारणत: दर सहा महिन्यांनी दोन नवीन वैमानिक संघात सामील होतात. नवीन वैमानिक प्रारंभी एका विमानाच्या सहाय्याने उड्डाणाने सुरुवात करतो. नंतर संघाचा कर्णधार अथवा उपकर्णधाराबरोबर उड्डाण केल्यानंतर दोन आणि नंतर तीन विमानांबरोबर उड्डाण असा क्रम सुरू होतो. चार, सहा विमानाच्या उड्डाणांमध्ये सहभागी होऊन शेवटी नऊ विमानांच्या उड्डाणात पदवीधर झाल्याचे सांगितले जाते. कमी पातळीवरील अतिशय जवळून होणाऱ्या उड्डाणात चुकीसाठी कोणताही मार्ग नाही. हे प्रदर्शन साधारणत: सरासरी ५५० किलोमीटर प्रतितास वेगाने केले जाते. ज्यात उच्च परिपक्वता, कौशल्य आणि शिस्त आवश्यक असते.

दृश्यमानता, ढगांचे आच्छादन आणि भूप्रदेश यावर अवलंबून कसरती उभ्या, आडव्या समतलात असू शकतात. जगप्रसिद्ध सूर्यकिरण संघात स्थान मिळवण्यासाठी भारतीय हवाई दलात सर्वोत्कृष्ट वैमानिक होणे महत्वाचे ठरते.