मोहिमेत ५४ हजारांहून अधिक नोंदी कमी

नाशिक : सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्याची नाशिक महसूल विभागात मोहीम राबविण्यात येत आहे. सातबारा उताऱ्यावरील अनावश्यक बोजा, नोंदीमुळे शेतकऱ्यांना खरेदी-विक्री, कृषी कर्ज घेण्यास अडचणी येत होत्या. मात्र या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या अभिनव मोहिमेत ५४ हजारहून अधिक नोंदी कमी करण्यात आल्या आहेत.

शेतकरी व सामान्य नागरिकांच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा असलेल्या सात-बारा उता-यांवर गेल्या अनेक वर्षांपासून इतर हक्कांमध्ये तगाई, बंडिंग, सावकारी बोजे आणि नजरगहाण यासह अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या नावाच्या विविध बोजांच्या नोंदी आहेत.

जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील जुन्या सावकारी कर्जांच्या नोंदीमुळे अनेक जटिल प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना जमिनीची खरेदी-विक्री करताना आणि संपादित जमिनीचा मोबदला वाटप करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामधून वाद निर्माण होत होते.

गेल्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अशा प्रकारच्या नोंदी निर्गत करण्याची धडक मोहीम घेऊन कालबाह्य नोंदी कमी करण्याचे आदेश विभागातील सर्व जिल्हाधिका-यांना विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते.

सात-बारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी झाल्यामुळे महसुली अभिलेख परिपूर्ण व दोषविरहित होऊन शेतकरी व सामान्य नागरिकांना त्याचा निश्चिातच फायदा होईल, याकडे गमे यांनी लक्ष वेधले. राज्यातील ही एक अभिनव मोहीम असून अभिलेखे दोषविरहित झाल्याने वाद विवाद कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विभागातील पाचही जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यांची एकूण संख्या ४६ लाख ९७ हजार १२२ इतकी आहे. यापैकी ७५ हजार ९९९ एवढया सात-बारा उताऱ्यांवरील इतर हक्कात कालबाहय नोंदी होत्या. ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात १७ हजार ९८८, धुळे जिल्ह्यात सहा हजार ४७८, नंदुरबार जिल्ह्यात सहा हजार ९८६, जळगाव जिल्ह्यात ३२ हजार ५५ आणि अहमदनगर जिल्ह्यात १२ हजार ४९२ कालबाह्य नोंदी होत्या.

दोन महिन्यात मोहीम राबवून सात बाऱ्यावरील या नोंदी कमी करण्याचे काम सुरू आहे. जळगावच्या रावेर येथील श्रीकृष्ण धांडे यांच्या सात बाऱ्यावरील अनावश्यक नोंदी कमी झाल्या. त्यामुळे तात्काळ कृषी कर्ज मिळाल्याचे त्यांनी सांगितले, तर रावेर तालुक्यातील खिरोदा गावातील जमिनीवर असलेला तगाई कर्जाचा अतिशय जुना कालबाह्य बोजा रद्द झाल्याबद्दल शेतकरी सतीश चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हानिहाय कमी झालेल्या नोंदी

ऑगस्ट महिन्यापासून सात-बारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्याची धडक मोहीम हाती घेतल्यानंतर मागील दोन महिन्यात एकूण ५४ हजार १५० कालबाह्य नोंदी कमी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात आठ हजार ५५२, धुळे जिल्ह्यात चार हजार ७९८, नंदुरबार जिल्ह्यात सहा हजार ००४, जळगाव जिल्ह्यात २५ हजार ५४९ तर अहमदनगर जिल्ह्यात नऊ हजार २८७ इतक्या कालबाहय नोंदी सात-बारा उता-यावरील इतर हक्कांमधून कमी करण्यात आलेल्या आहेत.